युवराज सिंह (Photo Credits: Getty)

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) माजी अष्टपैलू युवराज सिंह (Yuvraj Sungh) कायदेशीर अडचणीत सापडला असल्याचं दिसत आहे. 2020 पासून एका इन्स्टाग्राम लाइव्ह सत्रादरम्यान 'जातीवादी टीका'प्रकरणी युवराज विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे.  माजी अष्टपैलू खेळाडूंनी केलेली टिप्पणी दलित (Dalit) समुदायाचा अनादर करणारी होती, ज्याच्यासाठी युवीने नंतर सोशल मीडियावर माफीही मागितली होती. हरियाणाच्या हिसार येथील वकिलाने युवराजच्या 'जातीयवादी वक्तव्याबद्दल' पोलिसात तक्रार दाखल केली होती. मागील वर्षी इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान, युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) संदर्भात युवीने जातीवादी शब्द वापरले होते. यानंतर युवराजवर त्याच्या टिप्पणीसाठी टीकाही करण्यात आली होती. आणि माजी भारतीय क्रिकेटपटूने असे निवेदनही जारी केले होते की कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर त्यांचा कधीच विश्वास नव्हता. युवराजवर आयपीसी कलम 153, 153 (अ), 505, 295 आणि एससी / एसटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (युवराज सिंहने लाईव्ह चॅटमध्ये वापरला जातीवाचक शब्द, व्हायरल व्हिडिओवर यूजर्सकडून माफीची मागणी)

राजन कळसन यांनी मागील वर्षी युवराज विरोधात तक्रार दाखल केली होती. जून 2020 मध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली होती आणि युवीने ते शब्द हेतुपुरस्सर वापरल्याचा आणि दलित समाजाची बदनामी केल्याचा आरोप केला होता. या घटनेविषयी युवराजने नंतर निवेदन जाहीर केले होते आणि त्याने जाणीवपूर्वक काही म्हटले नाही असे स्पष्टीकरणही दिले होते. तो पुढे असेही म्हणाला की त्याच्या संभाषणाचा गैरसमज करून घेतला आहे. “मला समजले आहे की जेव्हा मी माझ्या मित्रांशी संभाषण करीत होतो तेव्हा माझा गैरसमज करून घेतला गेला, जो अवांछित होता. तथापि, एक जबाबदार भारतीय म्हणून मला हे सांगायचे आहे की मी नकळत कुणाच्या भावना दुखावल्या आहेत, त्याबद्दल मला दिलगिरी व्यक्त करायची आहे. भारत आणि तिथल्या सर्व लोकांवरील माझे प्रेम शाश्वत आहे,” युवराजने दिलेल्या निवेदनाच्या एका भागात म्हटले आहे.

दरम्यान, माजी अष्टपैलू खेळाडूने 2019 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. युवराज हा एमएस धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप विजयी संघाचा भाग होता. देशाला दोन वर्ल्ड कपचे  विजेतेपद मिळवून देण्यात युवीने मोलाची भूमिका बजावली होती. 2011 वर्ल्ड कपमध्ये अष्टपैलू कामगिरीबद्दल युवराजला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले होते.