आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) शेवटचा सुपर फोर सामना शुक्रवारी टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बांगलादेश संघाने टीम इंडियाचा 6 धावांनी पराभव केला आहे. मात्र, बांगलादेशचा संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यासोबतच टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता रविवारी अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शुभमन गिलने (Shubman Gill) शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. यासह शुभमन गिलनेही आपल्या शतकाच्या जोरावर या सामन्यात अनेक विक्रम केले आहेत. (हे देखील वाचा: IND vs SL Head to Head: आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारत - श्रीलंका नवव्यांदा भिडणार, जाणून घ्या शेवटच्या 8 लढतींमध्ये कोण कोणावर पडले भारी?)
शुभमन गिलची जादू
स्टार फलंदाज शुभमन गिलने 117 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या शतकासह शुभमन गिल या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. शुभमन गिलने आपल्या डावात 96 धावा पूर्ण करताच हा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. याशिवाय शुबमन गिलने यावर्षी आणखी एक मोठा विक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1500 धावा पूर्ण करणारा शुभमन गिल हा पहिला फलंदाज आहे. शुभमन गिलने आता केवळ 32 एकदिवसीय डावात 8 अर्धशतके आणि 5 शतके झळकावली आहेत. शुबमन गिल त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 65 पेक्षा जास्त सरासरीने फलंदाजी करत आहे.
विराट कोहलीला टाकले मागे
यावर्षी शुभमन गिलने एका विक्रमाच्या बाबतीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मागे टाकले आहे. शुभमन गिलने यावर्षी 36 डावात 6 शतके झळकावली आहेत. ज्यामध्ये 4 वनडे, 1 कसोटी आणि 1 टी-20 मध्ये शतकाचा समावेश आहे. 2023 मध्ये शुभमन गिल सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. या प्रकरणात शुभमन गिलने विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराट कोहलीने 2023 मध्ये 22 डावात 5 शतके केली आहेत. अलीकडेच विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 122 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. मात्र बांगलादेशविरुद्ध विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती.
शेवटच्या सामन्यात भारताचा पराभव
सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 265 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार शकीब अल हसनने सर्वाधिक 80 धावा केल्या. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 49.5 षटकांत केवळ 259 धावा करून अपयशी ठरली. टीम इंडियासाठी सलामीवीर शुभमन गिलने 121 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक तीन बळी घेतले.