Watch Video: यशपाल शर्मा यांचे ताबडतोड शॉट्स पाहून येईल MS Dhoni याची आठवण
यशपाल शर्मा (Photo Credit: Twitter/WisdenIndia)

भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचे 13 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशपाल कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983 वर्ल्ड कप (World Cup) विजेत्या भारतीय संघाचे (IndianTeam) फक्त सदस्यच नव्हते तर त्यांनी आपल्या बॅटिंगने संघाला अनेकदा स्पर्धेत विजय मिळवून दिला आहे. शर्मा यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या माजी खेळाडूंनाच नाही तर संपूर्ण क्रिकेटविश्वाला धक्का बसला आहे. यशपाल शर्माची महानता आकडेवारीने समजली जाऊ शकत नाही. हा खेळाडू मैदानावरील शॉट्सने प्रेक्षकांना भुरळ पडायचा. 1980 मधील शर्मा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता असून त्यांची ताबडतोड फलंदाजी पाहून जणू एकाला एमएस धोनीचीच (MS Dhoni) आठवण येईल. इतकी या दोन्ही फलंदाजांच्या शॉट्स खेळण्याच्या शैलीत समानता आहे. (Yashpal Sharma Passes Away: माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन, वर्ल्ड कप 1983 मध्ये केली होती बाजी पलटवणारी खेळी)

हा व्हिडिओ 23 डिसेंबर 1980 रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याचा आहे. प्रथम फलंदाजी करताना, बेन्सन आणि हेजेस वर्ल्ड कप मालिकेच्या या सामन्यात भारताने 50 षटकांत सात गडी गमावून 230 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शर्माने 105 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 72 धावांची तुफान खेळी केली होती. भारताने हा सामना सहा धावांनी जिंकला आणि शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 1983 वर्ल्ड कपमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर यशपाल यांनी अचानक फॉर्म गमावला होता. यामुळे त्यांनी कसोटी आणि त्यानंतर वनडे संघातील स्थान गमवावे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा घरगुती क्रिकेटमध्ये शर्मा अधिक यशस्वी झाले. त्यांनी 160 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 44.88 च्या सरासरीने 8933 धावा केल्या. तसेच 34 लिस्ट ए सामन्यात 34.42 च्या सरासरीने 1859 धावा केल्या.

दुसरीकडे, 1983 वर्ल्ड कप स्पर्धेबाबत बोलायचे तर यशपाल शर्मा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे दुसरे खेळाडू होते. वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 89 आणि सेमीफायनल सामन्यात यजमान इंग्लंडविरुद्ध 61 धावांच्या खेळीची भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली आहे. शर्मा 1979-83 दरम्यान भारतीय संघाच्या मधल्या फळीचा महत्त्वाचा भाग होते तरी ते भारताकडून फक्त 37 वनडे आणि 42 कसोटी सामने खेळू शकले. तिन्ही कसोटी सामन्यात 33.45 च्या सरासरीने 160.4 धावा आणि वनडे सामन्यात 28.48 च्या सरासरीने 883 धावा केल्या.