ICC WTC Final: आयपीएल (IPL) 2021 कोरोना व्हायरस प्रकरणांमुळे स्थगित झाल्यावर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) फायनल सामन्याचे वेध लागले आहे. आयसीसी चॅम्पियनशिपच्या उद्घाटन अंतिम सामन्यात टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघ भिडणार आहेत. दोन्ही संघात जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. शिवाय, मागील वर्षी भारताला किवी दौऱ्यावर कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव पत्करावा लागला होता तरी यंदा दोन्ही संघासाठी स्थिती वेगळी वेगळी आणि कठीण होईल कारण अंतिम सामना तटस्थ ठिकाणी होणार आहे. आयसीसी WTC क्रमवारीत दोन वर्षांनंतर पहिले दोन अव्वल स्थान मिळवल्यानंतर दोन्ही संघांनी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेसाठी अजून काही आठवडे शिल्लक असताना टीम इंडियाला सावध राहण्याची गरज असलेल्या 3 किवी खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत. (ICC WTC Final: भारताविरुद्ध WTC फायनल सामन्यात या 11 खतरनाक खेळाडूंना मैदानात उतरवू शकते किवी टीम)
केन विल्यमसन (Kane Williamson)
न्यूझीलंडचा कर्णधार त्याच्या क्लास आणि अभिजाततेसाठी ओळखला जातो. सध्या आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत तो 919 गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्याने फक्त 83 कसोटीत 7000 धावा केल्या आहेत. यामध्ये विल्यमसनने 4 द्विशतके, 24 शतके आणि 32 अर्धशतके ठोकली आहेत.
ट्रेंट बोल्ट (Trent Boult)
इंग्लंडच्या परिस्थितीत कीवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बॉल्टला मोठा धोका ठरू शकतो. नव्या चेंडूने स्विंग करण्याची त्याची क्षमता भारतीय फलंदाजांना त्रास देऊ शकते. जर चेंडू रिव्हर्स स्विंग झाला तर भारतीय मधल्या फळीसाठी 31 वर्षीय वेगवान गोलंदाज आणखी त्रासदायक सिद्ध होऊ शकतो. त्याने 71 सामन्यांत तब्बल 281 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात 8 मॅचमध्ये पाच विकेट आणि एका सामन्यात सर्व 10 विकेट्स घेतल्या आहेत.
काईल जेमीसन (Kyle Jamieson)
गेल्या वर्षी घरच्या मैदानावर भारताविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले तेव्हापासून काईल जेमीसनची गोलंदाज म्हणून होणारी वेगवान वाढ ही प्रेक्षकांसाठी एक ट्रीट ठरली आहे. जेमीसनने आपल्या छोट्या परंतु आजवरच्या यशस्वी कसोटी कारकीर्दीत विराट कोहली सारख्या अनेक फलंदाजांना अडचणीत पाडले आहे. WTC मध्ये आतापर्यंत जेमीसनने 36 विकेट्स काढल्या आहेत, ज्यात चार 5 विकेट्स आणि एका सामन्यात 10 विकेट्सचा समावेश आहे.