2011 आयसीसी वलार्ड कप फायनल फिक्सिंगच्या (World Cup Final Fixing) आरोपावरील चौकशीत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराला (Kumar Sangakkara) समन्स बजावण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारताने (India) श्रीलंकेचा 6 विकेटने धुव्वा उडवला आहे दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद जिंकले. अलीकडेच श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगामे (Mahindananda Aluthgamage) यांनी अंतिम सामना फिक्स असल्याचा धक्कादायक दावा केला होता. 2011 मध्ये श्रीलंकेचे क्रीडामंत्री म्हणून काम करणाऱ्या अलुथगमगे यांनी वर्ल्ड कप फायनल भारताला 'विकला' असा दावा केला होता. अलुथगमगेच्या आरोपांनंतर श्रीलंकेच्या सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. पोलिसांच्या विशेष पथकाने यापूर्वीच श्रीलंकेचे माजी मुख्य निवडकर्ता आणि कर्णधार अरविंदा डी सिल्वा आणि फलंदाज उपुल थरंगा यांची चौकशी केली आहे. आणि आता संगकाराला पोलिसांनी समन्स बजावला आहे. ('सचिनसाठी तरी भारत-श्रीलंका वर्ल्ड कप फायनलची चौकशी करा', माजी कर्णधार अरविंदा डी सिल्वाची ICC, BCCI, SLC कडे मागणी )
Dailymirror.lk च्या वृत्तानुसार, गुरुवारी संगकाराची चौकशी होईल. 2011 वर्ल्डकपमधील अंतिम सामन्यात भारताविरुद्ध सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा तो कर्णधार होता. गौतम गंभीर आणि एमएसधोनीच्या खेळीच्या जोरावर भारताने 275 धावांचे लक्ष्य 10 चेंडू शिल्लक असताना गाठले. दरम्यान, मंगळवारी डी सिल्वा यांची पोलिसांकडून सहा तासांहून अधिक चौकशी करण्यात आली. 2011 मध्ये डी सिल्वा राष्ट्रीय संघाचा मुख्य निवडकर्ता होते.
माजी क्रीडामंत्री अलुथगमगे यांनी श्रीलंका संघाने जाणीवपूर्वक अंतिम सामना गमावल्याची दावा केला होता. तथापि, चौकशी दरम्यान ते आपल्या दाव्यांवरून मागे हटले असे दिसत आहे. चौकशीदरम्यान अलुथगमगे म्हणाले की, वर्ल्ड कप फायनल फिक्स आहे की त्यांचा 'संशय' आहे आणि त्याच्या संशयाची चौकशी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. यापूर्वी, संगकाराने ट्वीटमध्ये अलुथगमगेकडे पुरावा मागितला आणि मॅच फिक्सिंगचे पुरावे असल्यास आयसीसीची मदत घेण्यास सांगितले होते.