महिला टी-20 विश्वचषकच्या (Women's T20 World Cup) सेमीफायनल फेरीतील अंतिम स्थान निश्चित करण्यासाठी गेतजेत्या ऑस्ट्रेलियाने (Australia) न्यूझीलंड (New Zealand) विरूद्ध 4 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह भारत, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसह सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 156 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 151 धावांपर्यंत मजल मारली न्यूझीलंडला 4 धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंड संघाकडून कर्णधार सोफी डिवाइनने (Sophie Devine) सर्वाधिक 31 धावा केल्या. याशिवाय रेचल प्रीस्ट (Rachael Priest) 17, मॅडी ग्रीन 28, सुझी बेट्सने 14 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूट (Megan Shutt) आणि जॉर्जिया वेयरहम (Georgia Wareham) यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आणि संघाचा विजय निश्चित केला. जेस जोनासेनला 1 विकेट मिळाली. महिला टी-20 विश्वचषकच्या सेमीफायनलमध्येसातव्यांदा स्थान मिळवणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ बनला. (Video: शेफाली वर्मा ने श्रीलंकाविरुद्ध महिला टी-20 वर्ल्ड कप मॅचमध्ये स्टंपच्या मागून मारलेला चौकार पाहून व्हाल चकित)
सोमवारी बेथ मूनीच्या 60 धावांवर जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध 5 विकेट गमावून 155 धावा केल्या. मेलबर्नमधील जंक्शन ओव्हल येथे न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाइनने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. 20 धावांवर ऑस्ट्रेलियाने एलिसा हीलीची पहिली विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंगदेखील 21 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली. मूनीने धीर सोडला नाही आणि एशले गार्डनरसह तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडकडून एना पीटरसनने 4 ओव्हरमध्ये 31 धावांवर 2 गडी बाद केले.
What. A. Game.#AUSvNZ | #T20WorldCup pic.twitter.com/ud1OfwBSGq
— T20 World Cup (@T20WorldCup) March 2, 2020
महिला टी-20 वर्ल्ड कपचा सेमीफायनल सामना 5 मार्च रोजी सिडनी क्रिकेट मैदानात (एससीजी) खेळला जाईल. अ ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतानंतर 6 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. भारताने यापूर्वीच सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला होता. न्यूझीलंड महिला संघ 4 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिल्या. बी ग्रुपमधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आफ्रिका महिला संघाचा लीग फेरीतील अजून एक सामना शिल्लक आहे. त्यामुळे, सेमीफायनलमध्ये कोणते संघ आमने-सामने येणार याचा निर्णय मंगळवारी निश्चित होईल.