लडाखमध्ये शाहिद झालेल्या जवानाचे वडील म्हणाले, 'नातवंडांनाही लढायला पाठवणार'; वीरेंद्र सहवागने व्हिडिओ शेअर करत ठोकला कडक सॅल्यूट (Watch Video)
शाहिद जवानाच्या वडिलांना सहवागने केला सलाम (Photo Credit: Twitter/IANS)

चीनच्या (China) मुजोरीनंतर प्रत्यक्ष ताबारेषेवर झालेल्या संघर्षात तेलंगणमधील कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 भारतीय जवानांना (Indian Soldiers) वीरमरण आले. याबाबत क्रीडा विश्वातील प्रत्येकाने संताप व्यक्त केला. भारतीय सूत्रांनुसार चीनचे तब्बल 43 सैनिकांपैकी काहींचा मृत्यू झाला तर काही गंभीररीत्या जखमी झाले आहेत. चिनी सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत शाहिद झालेल्यांना विराट कोहली, रोहित शर्मा, वीरेंद्र सहवाग (Virender Sehwag) यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सहवागने बिहार रेजिमेंटचे सिपॉय कुंदन कुमार (Sepoy Kundan Kumar) यांच्या वडिलांचा एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यांना कडक सॅल्यूट ठोकला. शाहिद कुंदन कुमार यांचे वडील म्हणाले की, "मुलाने देशासाठी बलिदान दिलयं. मला दोन नातवंड आहेत आणि मी त्यांनाही सीमेवर पाठवणार." त्यांच्या या निःस्वार्थ भावनेला सहवागने सॅल्यूट केलं. (India-China Clash: भारताच्या शाहिद जवानांवरील CSK डॉक्टराची वादग्रस्त पोस्ट व्हायरल, फ्रँचायझीकडून त्वरित निलंबनाची कारवाई)

सहवागने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, "हे ईश्वरुपी माणूस! चीनला लवकर आरसा दाखवण्यात येईल." पाहा हा व्हिडिओ:

गलवाण खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत भारताचे 17 जवान जखमी झाले होते. पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तीन आणि नंतर 17 असे 20 जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे 43 सैनिक या संघर्षांत मरण पावले. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या लष्कारात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. दरम्यान, भारताला शांतता हवी आहे. पण, चिथावणी दिल्यास चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी चीनला दिला. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांतील 20 शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असेही मोदी म्हणाले. "भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारताने कधीही कोणत्याही देशाला डिवचलेले नाही, तो भारताचा स्वभावही नाही. पण, भारत अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड करणार नाही. अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करताना भारताने आधीही आपले सामथ्र्य दाखवून दिले आहे. भारताने प्रत्येक वेळी आपली ताकद दाखवून दिली आहे," असे मोदी म्हणाले.