सोशल मीडियावर 'विराट' संघर्ष; कोहली विरुद्ध चाहते, एकमेकांना केले ट्रोल
विराट कोहली (संग्रहित, संपादित प्रतिमा)

विराट कोहली, बस नाम ही काफी हैं! क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही सैदव चर्चेत असणारं हे व्यक्तिमत्व. हे व्यक्तिमत्व सध्या क्रिकेटपासून काही दिवसांसाठी दूर आहे. पत्नी अनुष्काच्या वाढदिवसासाठी त्याने सध्या विश्राती घेतली आहे. पण, असे असले तरी, विराट वादापासून मुळीच दूर नाही. सोशल मीडियावर त्याच्या एका व्हिडिओमुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमुळे विराटला नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. तसेच, विराट कोहली विरुद्ध भारत्यी क्रिकेट चाहते, असा वादही पाहायला मिळत आहे.

विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराटने आपल्या अधिकृत अॅपच्या प्रमोशनसाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे सांगितले जात आहे. विराटच्या ३० व्या वाढदिवसाच्यादिवशी सोमवारी हे अॅप लाँन्च झाले. दरम्यान, या व्हिडिओत विराट आपल्या फोनमध्ये कमेंटबॉक्समध्ये आलेल्या कमेंट वाचत आहे. यात एका प्रतिक्रियेत एका चाहत्याने विराटचे वर्णन वाजवीपेक्षा अधिक महत्व दिलेला फलंदाज असे केले आहे. हा चाहता इतक्यावरच थांबला नाही तर, त्याने विराटच्या फलंदाजीत विशेष असे काहीच नाही. मला भारतीय खेळाडूंपेक्षा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे फलंदाज अधिक आवडतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चाहत्याच्या प्रतिक्रियेवर भडकला विराट

चाहत्यांची प्रतिक्रिया विराटच्या मनाला चांगलीच लागली असावी. या चाहत्याच्या प्रतिक्रियेवर भडकलेल्या विराटनेही तशीच सणसणीत प्रतिक्रिया दिली. या चाहत्याला प्रतिक्रियेदाखल दिलेल्या उत्तरात विराट म्हणतो, 'भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर हा देश सोड आणि दुसऱ्या देशात जाऊन राहा'. विराटचा हा अजब सल्ला पाहून सोशल मीडियावर चांगलाच वाद निर्माण झाला. (हेही वाचा,  ही अभिनेत्री आहे विराट कोहलीचे पहिले क्रश !)

विराट तू आम्हाला सल्ला देऊ नको; चाहत्यांकडून विराटला प्रत्युत्तर

दरम्यान, विराटने चाहत्याला दिलेला देश सोडण्याचा सल्ला पाहूऩ नेटकरी भलतेच चिडले. सोशल मीडियावर असंख्य युजर्सनी कोहलीवर टीकेचा वर्षाव केला. सोशल मीडियावर युजर्सनी विराटच्या वक्तव्यावर केलेल्या टीकेत, 'आम्हाला आमच्या पसंतीच्या क्रिकेटपटूंवर प्रेम करण्याचा अधिकार आहे. आम्ही भारतात रहातो म्हणून दुसऱ्या देशांचा तिरस्कार का करावा? विराट तू आम्हाला देश सोडून जायला सांगू शकत नाहीस, असा सूर उमटताना दिसत आहे.