विराट कोहली आणि आर अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) भारतीय संघाचा (Indian Team) 8 विकेटने पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. किवी संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर अंतिम फेरीत देखील सांघिक खेळ दाखवत विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले. यानंतर, स्पर्धेचा अंतिम सामना ‘बेस्ट ऑफ थ्री’ पद्धतीने खेळवावा अशी मागणी अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी केली होती. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) डब्ल्यूटीसीचा (WTC) विजेता ठरवण्यासाठी ‘बेस्ट ऑफ थ्री’ सामन्यांची मागणी केली. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात कोहलीने तीन सामन्यांची मागणी केल्याच्या वृत्तांवर नुकतंच वरिष्ठ भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) मौन सोडले. भारतीय कर्णधाराचा दृष्टीकोन स्पष्ट केरत कोहलीने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेची मागणी केल्याचे ऐकणे हास्यास्पद आहे असे अश्विन म्हणाला. (Team India: या माजी महान खेळाडूने टीम इंडियाला विजयाचा मंत्र, आयसीसी स्पर्धांच्या सेमीफायनल-फायनल स्पर्धेत असा मिळवू शकतात विजय)

कोहलीने बेस्ट ऑफ थ्री फायनल्सची कल्पना सुचविली आणि पुढे जाण्याचा पर्याय असल्याचे सांगितले, परंतु भारतीय कर्णधाराने यंदाच्या विश्वविजेतेपदासाठी बेस्ट ऑफ थ्री खेळण्याची मागणी केली नाही. एका कसोटी सामन्याने जगातील सर्वोत्तम कसोटी संघ ठरवण्याबाबत आपण 'पूर्ण सहमत' नसल्याचे कोहलीने म्हटले होते आणि विजेता एका सामन्याऐवजी बेस्ट ऑफ थ्री म्हणजे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेने निवडला जावा असा आग्रह धरला होता. “मला असे ऐकण्यात आले आहेत की विराट कोहलीने डब्ल्यूटीसी फायनलसाठी तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यास सांगितले पण ते हास्यास्पद आहे. सामना संपल्यानंतर माइकल अ‍ॅथर्टनने डब्ल्यूटीसीमध्ये वेगळ्या पद्धतीने काय करता येईल हे विचारले होते. विराटने एका विशिष्ट संदर्भात उत्तर दिले की जर तीन सामने खेळले गेले तर अनुकूलता आणि संघाचे कमबॅक करणे शक्य होईल. कोहलीने कोणतीही मागणी केली नाही,” अश्विनने आपल्या यूट्यूब वाहिनीवरील व्हिडिओत सांगितले.

दरम्यान, फक्त कोहलीचा नव्हे तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रींनी देखील अंतिम सामन्यासाठी रवाना होण्यापूर्वी या कल्पनेला पाठिंबा दिला. सामन्याबद्दल बोलायचे तर राखीव दिवशी किवी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि वेळ वाया न घालवता त्यांनी भारताला 170 धावांवर गुंडाळले. त्यांनतर कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरने अर्धशतकी भागीदारी करत संघाला 139 धावांचे लक्ष्य मिळवून दिले.