T20 World Cup मध्ये टीम इंडियासाठी धावा करण्यात ‘हा’ फलंदाज आहे अग्रेसर, ‘हिटमॅन’ रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर
रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत टीम इंडिया (Team India) पुन्हा एकदा जेतेपदाची मजबूत दावेदार म्हणून मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल, पण ‘विराटसेने’ला कठीण आव्हानांचा सामना करावा लागेल. संघात एकापेक्षा धुरंधर फलंदाज उपस्थित असले, तरी बहुतेक जबाबदारी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यासारख्या वरिष्ठ फलंदाजांवर असणार आहे. त्यांच्या धावा काढण्याचा परिणाम निश्चितपणे संघाच्या कामगिरीवर होईल आणि या दोन खेळाडूंपैकी विराट कोहली टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या इतिहासात श्रीलंकन दिग्गज महेला जयवर्धनेने 31 सामन्यात सर्वाधिक 1016 धावा केल्या आहेत. (Virat Kohli गेल्या 11 वर्षांपासून ‘या’ विक्रमासाठी तळमळतोय! यंदा T20 वर्ल्ड कपमध्ये होणार का स्वप्नपूर्ती?)

भारतासाठी टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत टी-20 विश्वचषकच्या 16 सामन्यात 86.33 च्या जबरदस्त सरासरीने टीम इंडियासाठी 777 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 9 अर्धशतके केली आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 89 आहे. तसेच रोहित शर्मा या प्रकरणात दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत टी-20 विश्वचषकात भारताकडून खेळताना त्याने 28 सामन्यात 39.58 च्या सरासरीने 673 धावा केल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 79 आहे. याशिवाय, 31 सामन्यात 23.72 च्या सरासरीने 593 धावा करणारा युवराज सिंह भारतासाठी टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे आणि त्याची सर्वोत्तम खेळी 70 धावांची आहे. या प्रकरणात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी चौथ्या स्थानावर आहे आणि त्याने 33 सामन्यांमध्ये 35.26 च्या सरासरीने 529 धावा केल्या आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 45 धावांची होती. पाचव्या क्रमांकावर गौतम गंभीर आहे, ज्याने 21 सामन्यांमध्ये 26.20 च्या सरासरीने 524 धावा केल्या आणि त्याचा सर्वोत्तम स्कोअर 75 धावा आहे.

दुसरीकडे सक्रिय फलंदाजाच्या यादीकडे पहिले तर वेस्ट इंडिजचा तडाखेबाज सलामीवीर क्रिस गेल 28 सामन्यात 920 धावा करून आघाडीवर आहे. आणि त्याच्या मागे विराट आणि रोहित, अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसनने 26 वर्ल्ड कप सामन्यात एकूण 587 धावा केल्या आहे. शाकिब बांग्लादेशसाठी सर्वाधिक टी- वर्ल्ड कप धावा करणारा फलंदाजही आहे.