
Punjab Kings vs Delhi Capitals, TATA IPL 2025 58th Match Stats: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 58 वा सामना आज म्हणजेच 08 मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. पंजाब किंग्जचा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि 11 सामन्यांत सात विजयांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना 'करो या मरो' असा आहे. जर दिल्लीचा आज पराभव झाला तर त्यांचे प्लेऑफमध्ये खेळण्याचे स्वप्न जवळजवळ संपुष्टात येईल.
हेड टू हेड रेकाॅर्ड (PBKS vs DC Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांमधील सामने समान लढतीचे झाले आहेत. पंजाब किंग्जच्या संघाने 17 सामने जिंकले आहेत. तर, दिल्ली कॅपिटल्सने फक्त 16 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. या दरम्यान पंजाब किंग्जने विजय मिळवला होता. दिल्ली कॅपिटल्सला हा सामना जिंकून त्यांची आकडेवारी सुधारायची आहे.
हे देखील वाचा: IPL 2025 MI vs GT: हार्दिक पंड्या आणि आशिष नेहरावर BCCI ची कारवाई; आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ठोठावला दंड
पंजाबच्या 'या' खेळाडूंनी दिल्लीविरुद्ध केली आहे चांगली कामगिरी
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 4 डावात 39.00 च्या सरासरीने आणि 128.57 च्या स्ट्राईक रेटने 117 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर व्यतिरिक्त, घातक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 19.00 च्या सरासरीने 95 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत, अनुभवी लेग-स्पिनर युजवेंद्र चहलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 5 सामन्यात 31.66 च्या सरासरीने आणि 10.00 च्या इकॉनॉमी रेटने 6 विकेट्स घेतल्या आहेत.
दिल्लीच्या 'या' खेळाडूंनी पंजाबविरुद्ध केली आहे चांगली कामगिरी
आयपीएलच्या इतिहासात, दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फलंदाज केएल राहुलने पंजाब किंग्जविरुद्ध 13 डावात 39.08 च्या सरासरीने आणि 121.22 च्या स्ट्राईक रेटने 457 धावा केल्या आहेत. या काळात केएल राहुलने 4 अर्धशतके झळकावली आहेत. पंजाब किंग्जविरुद्ध केएल राहुलचा सर्वोत्तम स्कोअर 79 धावा आहे. केएल राहुल व्यतिरिक्त, फाफ डू प्लेसिसने पंजाब किंग्जविरुद्ध 19 सामन्यांमध्ये 143 च्या स्ट्राईक रेटने 571 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत, अनुभवी मिचेल स्टार्कने पंजाब किंग्जविरुद्ध 6 सामन्यांमध्ये 8,26 च्या इकॉनॉमीने 8 विकेट्स घेतल्या आहेत.
धर्मशाळेत दोन्ही संघांची कामगिरी
आयपीएलच्या इतिहासात, पंजाब किंग्जने आतापर्यंत धर्मशाळा स्टेडियमवर 14 सामने खेळले आहेत. या दरम्यान पंजाब किंग्जने सहा सामने जिंकले आहेत आणि आठ सामने गमावले आहेत. या मैदानावर पंजाब किंग्जचा सर्वोत्तम धावसंख्या 232/2आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत या मैदानावर एकूण चार सामने खेळले आहेत. या काळात दिल्ली कॅपिटल्स संघाने दोन सामने जिंकले आहेत आणि दोन सामने गमावले आहेत. या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स संघाचा सर्वोत्तम धावसंख्या 213 धावा आहे. या मैदानावर मोठे स्कोअर होतात. अशा परिस्थितीत, एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.