एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक झळकावल्यानंतर सचिन तेंडुलकर (Photo Credits: @BCCI/Twitter)

भारतीय महिला संघ (India Women's Cricket Team) 2 जून रोजी पुरुष टीमसोबत इंग्लंड दौऱ्यासाठी (England Tour) रवाना होणार आहे. त्यापूर्वी संघाची युवा फलंदाज प्रिया पुनिया (Priya Punia) आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रियाच्या आईचे कोरोना व्हायरसमुळे नुकतंच निधन झालं. प्रियाने आपला इंस्टाग्राम अकाउंटवर भावून पोस्ट शेअर करून यूजर्सना माहिती दिली. बीसीसीआयने आज, 19 मे पासून खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यापूर्वी बायो-बबलमध्ये दाखल होण्यास सांगितले होते. अशास्थितीत आईच्या निधनांनंतर प्रियाला देखील आता आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून संघासाठी आपली जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे यायचे आहे. मात्र, कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीला गमावून लगेच क्रिकेटच्या मैदानावर परतणारी प्रिया पहिली किंवा अखेरची क्रिकेटपटू नाही. (COVID-19: इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताच्या स्टार खेळाडूवर कोसला दुःखाचा डोंगर, कोरोनाने हिरावलं आईचे छत्र)

भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर असे अनेक खेळाडू विशेषतः क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी मैदानाची वाट धरली आणि संघासाठी कामगिरी बजावली. पहा कोण आहेत ते पाच क्रिकेटर्स:

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)

सचिन स्वत: 1999 मध्ये वडिलांच्या निधनानंतर इंग्लंडहून मायदेशी परतला आणि अंत्यसंस्कारात हजेरी लावून दुसऱ्या दिवशी केनियाविरुद्ध सामना खेळण्यासाठी उपस्थित झाला. या सामन्यात त्याने 140 धावांची शतकी खेळी करत वडिलांना श्रद्धांजली वाहिली होती.

विराट कोहली (Virat Kohli)

यशस्वीतेच्या मार्गावर विराट कोहलीने बर्‍याच अडचणींचा सामना केला आहे, परंतु जेव्हा क्रिकेटमध्ये तो स्वत:ला ओळख देण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. कोहली हा दिल्लीसाठी रणजी खेळत असताना त्याला वडिलांविषयी माहिती मिळाली. संघ सोडून आपल्या कुटुंबासमवेत राहण्याचा किंवा चार दिवसांचा रणजी खेळ पूर्ण करण्याचा त्याच्यासमोर पर्याय होता आणि त्याने अनपेक्षित असा पर्याय निवडला. दुसर्‍या दिवशी 18 वर्षीय विराट मैदानात उतरला आणि 90 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीमुळे टीम दिल्लीने फॉलोऑन टाळला.

मनदीप सिंह (Mandeep Singh)

आयपीएल 2020 मध्ये अनेक घटना घडत असताना किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मनदीप सिंहला वडिलांच्या निधनाची बातमी कळाली. तो यावेळी युएई येथे होता आणि कोविड-19 मार्गदर्शक सूचनांमुळे त्याला वडिलांच्या अंत्यसंकरात जात आले नाही. त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पुढील सामने खेळले. यादरम्यान त्याने केकेआर विरोधात संघाच्या विजयात शानदार 66 धावा ठोकल्या.

मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)

टीम इंडियाच्या डाऊन अंडर मालिका विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सिराजच्या डोक्यावरून कांगारू दौरा सुरु होण्यापूर्वीच वडिलांचे छत्र हिरावले. सिराजला बीसीसीआयकडून घरी परतण्याचा पर्याय देण्यात आला होता पण त्याने कोरोना निर्बंधांमुळे त्याने घरी न परतता टीमसोबत राहण्याचा निर्णय घेतला. सिराजचा निर्णय योग्य ठरला. त्याने कसोटी पदार्पणात संघाचा डाऊन अंडर भारताला दुसरी कसोटी मालिका जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले.

राशिद खान (Rashid Khan)

ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळत असताना खान वडिलांच्या निधनाची बातमी समजली. फिरकीपटूसाठी हा मोठा धक्का होता, परंतु त्याने खेळाशी निष्ठावंत राहिला आणि ब्रिस्बेन हीट विरोधात पुढील सामना खेळला.