IPL Trophy (Photo Credit - X)

SRH vs KKR IPL 2024 Final: आयपीएल 2024 (IPL 2024) क्वालिफायर-2 चा सामना शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा 36 धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये धडक घेतली आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत सनरायझर्स हैदराबाद संघ कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR vs SRH) भिडणार आहे. अंतिम फेरीत विजयी होणाऱ्या संघाला ट्रॉफीसह कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. या वर्षी विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाईल हे आम्ही तुम्हाला सांगू, तसेच, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती पैसे मिळतील हे देखील माहिती सांगू...(हे देखील वाचा: SRH vs KKR IPL 2024 Final: कोलकाता की हैदराबाद, आयपीएल 2024 चे विजेतेपद कोण जिंकणार? अंतिम सामन्यात 'या' खेळाडूंमध्ये होणार मोठी लढत)

विजयी संघ होणार मालामाल

आयपीएल 2024 च्या विजेत्या संघाला केवळ चमकदार ट्रॉफी मिळणार नाही तर बक्षीस म्हणून मोठी रक्कम देखील मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2024 च्या चॅम्पियन टीमला 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संघांनाही करोडो रुपये मिळणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 7 कोटी रुपये, तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 6.5 कोटी रुपये मिळतील. यानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 6.5 कोटी रुपये मिळतील. कारण त्यांचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला 7 कोटी रुपये मिळणार आहेत.

ऑरेंज कॅप, पर्पल कॅप विजेत्याला मिळणार 15 लाख

आयपीएलमधील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळालेल्या बक्षीस रकमेशिवाय इतरही अनेक पुरस्कार दिले जातात. यामध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप या पुरस्कारांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला या सर्व पुरस्कारांबद्दल आणि त्यांच्याशी संबंधित बक्षीस रकमेबद्दल सांगत आहोत. आयपीएलच्या संपूर्ण हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप पुरस्कार दिला जातो. ऑरेंज कॅप विजेत्याला 15 लाख रुपये दिले जातील. ऑरेंज कॅप जिंकण्याच्या शर्यतीत विराट कोहली आघाडीवर आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यावेळी 15 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. तर, इमर्जिंग खेळाडूला 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. हर्षल पटेल पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे.