IPL मधील पहिला सामना गमावल्यानंतर जेतेपद पटकावण्यात मुंबई इंडियन्सचा पहिला नंबर, CSK बरोबर एकदा घडले असे, पाहा संपूर्ण लिस्ट
मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) विजेतेपद सर्वाधिक वेळा जिंकण्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ पहिल्या क्रमांकावर आहे. 2013 मध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार बनल्यापासून या संघाने जो वेग पकडला तो कौतुकास पात्र आहे आणि शेवटच्या हंगामात म्हणजेच 2020 मध्ये देखील या संघाने यूएईमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. आणि आता पुन्हा एकदा आयपीएलचा (IPL)  काफिला यूएईला पोहचला असून मुंबईचा संघ तिथे पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल. मुंबई इंडियन्सचा आजवरचा इतिहास पहिला तर संघ नेहमी संथ सुरुवात करतो पण अखेरीस बाजी मारतो. रोहितच्या नेतृत्वात यंदा मुंबईला रेकॉर्डस् सहावे तर आयपीएल विजेतेपदाची हॅट्ट्रिक मारण्याची संधी आहे. हा असा कारनामा आहे जो आजवर कोणत्याही संघाला जमलेला नाही. तसेच यंदा विजयी झाल्यास चेन्नई सुपर किंग्सनंतर मुंबई आयपीएल विजेतेपद सलग दोनदा जिंकणारा दुसरा संघ ठरेल. चेन्नईने ही कमाल 2010 आणि 2011 मध्ये केली होती. (IPL मध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची संपूर्ण यादी पाहा, ‘हा’ वेगवान गोलंदाज नंबर 1 सिंहासनावर विराजमान)

लक्षात घेण्यासारखे म्हणजे मुंबईच्या संघाने आतापर्यंत पाच हंगामात आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे आणि प्रत्येक वेळी त्यांनी पराभवाची सुरुवात केली आहे. म्हणजेच, जेव्हा जेव्हा मुंबई विजेता बनला, तेव्हा त्याने त्या हंगामातील पहिला सामना गमावला आहे. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये मुंबईने जेतेपद पटकावले, परंतु प्रत्येक हंगामात त्यांनी पहिल्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले आहे. मुंबई व्यतिरिक्त, या लीगचे इतर काही संघ देखील आहेत ज्यांनी हंगामातील पहिला सामना गमावल्यानंतर जेतेपद जिंकले आहे.

आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्सने जेतेपद पटकावले, पण या संघाने आपला पहिला सामना गमावला. यानंतर, 2010 मध्ये CSK आयपीएल चॅम्पियन बनला आणि एमएस धोनीच्या नेतृत्वातील या संघाने देखील आपला पहिला सामना गमावला होता. यानंतर, 2012 मध्ये जेव्हा कोलकाता नाईट रायडर्स संघ पहिल्यांदा चॅम्पियन बनला, तेव्हा त्यांनी पहिल्या सत्रात पराभवासह या हंगामाची सुरुवात केली होती. इतकंच नाही तर डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात आतापर्यंत एकमात्र विजेतेपद जिंकणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने 2016 मध्ये जेतेपद पटकावले तेव्हा त्यांना पहिल्या साखळी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.