Ravindra Jadeja | (Twitter / @bcci)

न्यूझीलंड (New Zealand) विरोधात आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामना साउथॅम्प्टन येथे खेळला जात असताना भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. वेस्ट इंडिजचा स्टार जेसन होल्डरला (Jason Holder) ओव्हरटेक करत जडेजाने आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) नंबर 1 अष्टपैलू म्हणून स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात सेंट लुसिया (St Lucia) येथे झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या समाप्तीनंतर 23 जून रोजी ताज्या क्रमवारीत जडेजाने 2017 नंतर पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये जेसन होल्डर 412 गुणांसह अव्वल स्थानावर होता पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अपयशी कामगिरीनंतर होल्डरची 28 गुणांनी घसरण झाली आहे. (ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत Steve Smith पुन्हा बनला नंबर-1 फलंदाज, जाणून घ्या केन विल्यमसन-विराट कोहली यांची रँकिंग)

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी जडेजाच्या खात्यात 386 गुण आहेत. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर आहे तर भारताचा ऑफस्पिनर आर अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे. आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत जडेजा 16व्या स्थानावर आहे तर त्याचा फिरकी साथीदार अश्विन ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या दुसर्‍या मागे स्थानावर आहे. इंग्लंडच्या स्टोक्सचे 377 गुण आहेत. कसोटी अष्टपैलू क्रमवारीत बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन पाचव्या क्रमांकावर आहे. याशिवाय कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत स्टिव्ह स्मिथ पहिल्या स्थानावर कायम आहे. केन विल्यमसन दुसर्‍या क्रमांकावर आहे तर भारताचा विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाज म्हणून क्विंटन डी कॉकने प्रथम दहामध्ये स्थान मिळवले आहे, तर गोलंदाजीच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये कोणताही बदल झालेला नाही, परंतु कगिसो रबाडा आणि मिचेल स्टार्कने काही स्थानांची झेप घेतली आहे. तथापि, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर फेरबदल दिसू शकतो.

दरम्यान, जडेजा सध्या साऊथॅम्प्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध चालू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना खेळत आहे. त्याने पहिल्या डावात 15 धावा केल्या आणि टिम साउदीला बाद करत किवी संघाचा पहिला डाव 249 धावांवर संपुष्टात आणला. राखीव दिवशी त्याने भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी अशी अपेक्षित आहे जे ऐतिहासिक सामन्याचे भवितव्य ठरवेल.