भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. ज्यामध्ये आशिया कपसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा केली जाऊ शकते. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविडही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे आशिया कपमध्येही टीम इंडियामध्ये मोठा बदल होऊ शकतो. दिल्लीत होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीत टीम इंडियाचा उपकर्णधार बदलला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. सध्या हार्दिक पांड्या टीम इंडियाचा उपकर्णधार आहे, मात्र पांड्याच्या जागी आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची कमान सांभाळणाऱ्या जसप्रीत बुमराहला टीम इंडियाचा नवा उपकर्णधार बनवलं जाऊ शकतं, असं मानलं जात अशा.
बुमराह यापूर्वीही होता उपकर्णधार
बुमराहने याआधी संघाचे उपकर्णधारपद भूषवले आहे. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय सामन्यांमध्ये बुमराहने टीम इंडियाचा उपकर्णधारही होता. तर एका कसोटी सामन्यातही त्याने टीम इंडियाची कमान सांभाळली आहे. अशा स्थितीत उपकर्णधारपदाच्या अनुभवात तो हार्दिक पांड्याच्या पुढे दिसत आहे. अशा परिस्थितीत बोर्ड त्याला आशिया कप आणि विश्वचषक या दोन्ही स्पर्धांसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करू शकते, असे मानले जात आहे.
विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून संघ निवडला जाईल
आशिया चषकासाठी टीम इंडियाची निवड विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे भारत आशिया चषकात जो संघ जाईल, जवळपास तोच संघ विश्वचषकातही दिसणार आहे. ICC ने विश्वचषकासाठी संघ निवडण्यासाठी 5 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे.
आशिया चषक 30 ऑगस्टपासून होणार आहे
आशिया चषक 30 ऑगस्टपासून आयोजित होणार आहे. जिथे भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. यावेळी एकदिवसीय विश्वचषक लक्षात घेऊन आशिया कपचे आयोजन एकदिवसीय फॉर्मेटमध्ये करण्यात आले आहे. तर गेल्या वेळी ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती.