IND vs AFG, T20 World Cup 2021: अफगाणिस्तानचा ‘हा’ खेळाडू ठरला आहे टीम इंडियावर भारी, ‘करो या मरो’च्या सामन्यात घेणार विराट ब्रिगेडचा समाचार!
अफगाणिस्तान क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

T20 विश्वचषक 2021 मध्ये भारताचा (India) तिसरा सामना 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानशी (Afghanistan) होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडिया (Team India) पहिले दोन सामने गमावल्यानंतर उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद नबीच्या (Mohammad Nabi) अफगाणिस्तान संघाविरुद्ध सामन्यात एक चूक टीम इंडियासाठी सेमीफायनलचे दरवाजे पूर्णपणे बंद करू शकते. त्यामुळे भारतीय संघापुढे (Indian Team) विजय हाच एकमेव ध्येय असेल. पण तेही तितकं सोपं असणार नाही. कारण अफगाणिस्तानकडे सध्या कमकुवत खेळाडू नाहीत. त्यांच्याकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजांची संपूर्ण फौज आहे. आणि यामध्ये सर्वात आघाडीच्या खेळाडूबद्दल बोलायचे तर राशिद खानचे (Rashid Khan) नाव सर्वात पहिले आपल्या मनात येते. अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खानचा भारतीय फलंदाजांसमोर प्रभावी रेकॉर्ड असून ‘करो या मरोच्या सामन्यापूर्वी भारतासाठी ही वाईट बातमी आहे. (T20 World Cup 2021 Points Table: अफगाणिस्तानची सेमीफायनल शर्यतीत सरशी; न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा टीम इंडियाला फटका, आता शिल्लक फक्त एकच पर्याय)

भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे तर कर्णधार विराट कोहलीने राशिद खानच्या 24 चेंडूंचा सामना केला. त्यालाही अफगाण गोलंदाजाविरुद्ध 100 चा स्ट्राईक रेट गाठता आलेला नाही. विराट कोहलीने 24 चेंडूत केवळ 21 धावा केल्या आहेत. तो एकदा राशिदचा शिकारही झाला आहे. त्याच्याशिवाय टीम इंडियाचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने आतापर्यंत खानच्या 16 चेंडूंचा सामना केला असून त्याला 19 धावाच करता आल्या आहेत. मात्र यादरम्यान खानने त्याला दोनदा पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अशा परिस्थितीत रोहितला नव्या रणनीतीने अफगाण लेगस्पिनरचा सामना करावा लागणार आहे. केएल राहुल हा भारताचा दुसरा सलामीवीर आहे. मात्र राशिदसमोर त्याचाही रेकॉर्ड चांगला नाही आहे. राहुलने आतापर्यंत राशिदचे 30 चेंडू खेळले असून 18 धावाच केल्या आहेत. उल्लेखनीय आहे की राशिदने राहुलला 30 चेंडूत तीनदा बाद केले.

तसेच हार्दिक पांड्या अलीकडच्या काळात फलंदाजीत फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. या दरम्यान राशिद खानचा सामना करण्याबद्दल बोललो तर त्याची स्थिती आणखी खराब आहे. राशिदसमोर पांड्याने 37 चेंडूत केवळ 27 धावा केल्या आहेत. तसेच दोन वेळा त्याने राशिद खानला आपली विकेट दिली आहे. दुसरीकडे, भारतासाठी एक गुड-न्यूज म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारताने सलामीवीर म्हणून ईशान किशनला मैदानात उतरवले होते. मात्र तो अफगाणिस्तानविरुद्ध खेळला तर तो भारतासाठी उपयुक्त ठरू शकतो. किशनने राशिदहे आतापर्यंत 51 चेंडू खेळले असून 64 धावा केल्या आहेत. यादरम्यान तो फक्त एकदाच राशिदचा बळी ठरला आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांविरुद्ध प्रभावी खेळीच्या जोरावर राशिद खान पुन्हा एकदा माजी चॅम्पियन संघाची झोप उडवण्यासाठी उत्सुक असेल.