भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात आज आयसीसी टी-20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 28 वा सामना खेळला गेला. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा (Team India) 8 गडी राखून धुव्वा उडवला. भारताचे 111 धावांचे लक्ष्य किवी संघाने 14.3 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले. या पराभवानंतर भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आता ‘विराट ब्रिगेड’पुढे एकच पर्याय शिल्लक आहे. दोनपैकी दोन पराभवांमुळे आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप 2021 मधील सुपर 12 मधील गट 2 मध्ये टीम इंडिया पाकिस्तान, अफगाणिस्तान (Afghanistan), न्यूझीलंड आणि नामिबिया यांच्या पिछाडीवर पडली आहे. रविवारी न्यूझीलंडच्या भारतावर आठ गडी राखून मिळवलेल्या विजयाने सेमीफायनलच्या रेसने वेगळेच वळण घेतले आहे. (IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: हाय व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव, हॅटट्रिकसह विश्वचषकातील परंपरा कायम राखण्यात न्यूझीलंड यशस्वी)
टीम इंडिया सध्या सुपर 12 च्या गट 2 मध्ये 5 व्या स्थानावर आहे आणि उपांत्य फेरीत जाण्यासाठी त्यांना त्यांचे पुढील तीनही सामने- अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नंतर नामिबियाविरुद्ध जिंकणे आवश्यक आहे. मात्र, टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ते पुरेसे ठरणार नाही. भारताचा नेट रनरेट सुधारण्यासाठी न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने पराभव होणे देखील गरजेचे आहे. अफगाणिस्तान देखील चांगला खेळत आहेत आणि ते +3.097 रनरेटसह दुसर्या क्रमांकावर विराजमान आहेत. त्यामुळे, जर त्यांना संधी मिळवायची असेल तर भारताला त्यांना मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. यादरम्यान भारताने एकही सामना गमावला तर ते उपांत्य फेरी गाठण्याची संधी त्यांच्या हातून जाईल.
याशिवाय न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर भारतासमोर आता अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचे आव्हान आहे. भारताने तिन्ही सामने जिंकले तरी त्याचे 6 गुण होतील, परंतु 2 सामन्यांमध्ये निराशाजनक पराभवामुळे त्यांचा नेट रनरेट कमी झाला आहे, ज्याचा फायदा इतर संघांना होऊ शकतो. रनरेटच्या आधारावर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा संघ भारताचा वरचढ ठरू शकतात. अशा स्थितीत भारतीय संघाला आता तिन्ही संघांना मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल, तरच त्यांचा नेट रनरेट पॉसिटीव्ह करणे शक्य होईल. दुसरीकडे, इतर संघाच्या खेळावरही त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. सध्या पाकिस्तानसह अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड सेमीफायनलसाठी प्रबळ दावेदार आहेत. तसेच नामिबियाविरुद्ध विजय मिळवून अफगाणिस्तानने देखील सेमीफायनलसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.