T20 World Cup 2021: ‘या’ खेळाडूच्या गोलंदाजीवर फलंदाज आतापर्यंत नाही मारू शकले एकही षटकार, उडवले विरोधी फलंदाजांचे होश!
एनरिच नॉर्टजे (Photo Credit: Twitter)

T20 विश्वचषक 2021 मध्ये चाहत्यांना जबरदस्त फलंदाजांचा जबरदस्त शो पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा तडाखेबाज फलंदाज जोस बटलरने आपल्या लांबलचक षटकारांनी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. परंतु या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) एक असा गोलंदाज देखील आहे ज्याच्या चेंडूंवर आतापर्यंत फलंदाज एकही षटकार खेचू शकलेले नाही. आणि तो कोणी अन्य नव्हे तर दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) आहे, ज्याच्या वेगवान चेंडूंनी विरोधी फलंदाजांचे होश उडवले. मंगळवारी एनरिच नॉर्टजेने आपल्या वेगवान चेंडूंनी बांगलादेशी (Bangladesh) संघाला गुडघे टेकायला भाग पाडले. नॉर्टजेने अवघ्या 8 धावांवर 3 विकेट घेतल्या. नॉर्टजेच्या गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव करत स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवला. (T20 World Cup 2021: दक्षिण आफ्रिकेने विजयी हॅटट्रिक, विश्वचषकात ‘या’ दोन संघाचा गेम-ओव्हर)

केवळ बांगलादेशविरुद्ध सामनाच नव्हे तर मागील तीनही सामन्यांमध्ये नॉर्टजेने अप्रतिम कामगिरी केली आहे. नॉर्टजेने या स्पर्धेत 15.2 षटके टाकली आहेत ज्यात त्याने 8 विकेट घेतल्या आहेत आणि त्याच्या गोलंदाजी फलंदाज एकही षटकार मारू शकलेले नाहीत. यादम्यान नॉर्टजेचा इकॉनॉमी रेट देखील फक्त 4.56 आहे. नॉर्टजेने बांगलादेशविरुद्ध आणखी एक मनोरंजक विक्रम आपल्या नावे केला आहे. टी-20 विश्वचषकच्या इतिहासात फलंदाजाला हिट विकेट करणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकन गोलंदाज आहे. बांग्लादेशचा नसुम अहमद हिट-विकेट बाद झाला होता. 2007 मध्ये न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मार्क गिलेस्पीनेही केनियाविरुद्ध हिट-विकेट म्हणून विकेट घेतली होती.

टी-20 विश्वचषकच्या सुपर 12 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. मात्र नंतर अष्टपैलू कामगिरीच्या बळावर संघाने वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि बांग्लादेशवर मोठा विजय मिळवला. दरम्यान, आफ्रिकी संघासाठी नॉर्टजेने टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 4 सामन्यात सर्वाधिक 8 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा 7 सामन्यात 14 विकेट घेऊन यादीत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. नॉर्टजे ​​आयपीएल 2020 आणि आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 8 सामन्यात 12 विकेट घेतल्या.