T20 World Cup 2021: दक्षिण आफ्रिकेने विजयी हॅटट्रिक, विश्वचषकात ‘या’ दोन संघाचा गेम-ओव्हर
टेंबा बावुमा (Photo Credit: PTI)

ICC T20 विश्वचषक 2021 च्या गट 1 च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) बांगलादेशचा (Bangladesh) 6 गडी राखून पराभव करून स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला. या पराभवासह बांगलादेशचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या गटातून बांगलादेशशिवाय श्रीलंकाही (Sri Lanka) उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचे सहा गुण झाले असून त्यांच्या गटातील उपांत्य फेरीतील त्यांचा दावा मजबूत झाला आहे. गुणतालिकेत हा संघ इंग्लंडनंतर (England) दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने आधीच उपांत्य फेरी गाठली आहे. उल्लेखनीय आहे की बांगलादेश आणि श्रीलंका पहिल्या फेरीसाठी पात्र ठरलेले पहिले दोन संघ होते व तेच आता सर्वप्रथम स्पर्धेबाहेर पडले पडले आहेत. (SA vs BAN, T20 World Cup 2021: दक्षिण आफ्रिकेने विजयाची हॅट्ट्रिक साधत बांगलादेशला 6 गडी राखून धूळ चारली)

दरम्यान, गट 1 च्या अन्य संघांबद्दल बोलायचे तर ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांत दोन विजयांसह चार गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गट 1 आणि गट 2 मधून अव्वल दोन संघ सेमीफायनल फेरीत पोहोचतील. बांगलादेशने या गटातील चार सामन्यांपैकी एकही सामना जिंकलेला नाही आणि गुणतक्त्यात तळाशी बसलेले आहे. याशिवाय तीन सामन्यांतून एक विजय आणि दोन पराभवांसह वेस्ट इंडिज बांगलादेशच्या दोन गुणांनी आघाडीवर आहे. श्रीलंकेने चारपैकी केवळ एकच सामना जिंकला आणि त्यांचे दोन गुण आहेत. ग्रुप 1 मधून इंग्लंडनंतर केवळ दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित दिसत आहे. आजच्या सामन्यात आफ्रिकन गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करून बांगलादेशचा डाव अवघ्या 84 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 13.3 ओव्हरमध्ये चार गडीगमावून लक्ष्य गाठले.

दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार टेंबा बावुमा (नाबाद 31) आणि रासी व्हॅन डर ड्युसेन (22) यांनी चौथ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी करून संघाला विजयीरेष ओलांडून दिली. बावुमाने 28 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला. डुसेननेही 27 चेंडूत 2 चौकार मारले. डेविड मिलरने नाबाद 5 धावा केल्या. बांगलादेशकडून तस्किन अहमदने चार षटकांत 18 धावांत दोन विकेट घेतल्या. तसेच मेहदी हसन आणि नसुम अहमद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. बांगलादेशकडून मिळालेल्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही खराब झाली आणि पॉवरप्लेमध्ये संघाने 33 धावांवर तीन विकेट गमावल्या.