आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने (Indian Team) सलग दोन पराभवांना मागे टाकून पहिला विजय खिशात घातला आहे. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलने (KL Rahul) दमदार फलंदाजी करताना शतकी भागीदारी करत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. दोघांनी टी-20 क्रिकेटमध्ये चौथ्यांदा टीम इंडियाला (Team India) 100 धावांच्या पार नेले आणि एक विशेष कामगिरी आपल्या नावे केली. बुधवार 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) नाणेफेक गमावून टीम इंडिया पहिले फलंदाजीला उतरली. रोहित आणि राहुलने टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. ‘करो या मरो’च्या या महत्त्वपूर्ण सामन्यात दोन्ही सलामीवीरांनी मिळून पॉवरप्लेमध्ये 85 धावा कुटल्या. ही जोडी इथेच थांबली नाही आणि टी-20 मध्ये चौथ्यांदा भारतीय संघासाठी शतकी भागीदारी केली. (Rahul Dravid याच्या प्रशिक्षक पदावर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, ‘मिस्टर डिपेंडेबल’च्या Head Coach म्हणून नियुक्तीवर पहा काय म्हणाला ‘हिटमॅन’)
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोहित आणि राहुलची जोडी आता शतकी भागीदारीच्या बाबतीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. पहिल्या स्थानावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आहेत. दोघांनीही आतापर्यंत 5 वेळा ही अप्रतिम कामगिरी केली आहे. रोहित आणि राहुलची जोडी दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे, ज्यांच्या नावावर 4 वेळा शतकी भागीदारी करण्याचा विक्रम आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीच्या नावावर देखील 4 वेळा अशी कामगिरी करण्याच्या विक्रमाची नोंद आहे. याशिवाय टी-20 मध्ये सर्वोच्च भारतीय सलामी भागीदारीचा विक्रम रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीच्या नावावर आहे. दोघांनी डर्बनमध्ये पहिल्या विकेटसाठी 160 धावा केल्या होत्या. आता रोहित त्याचा जोडीदार राहुलसोबत दुसऱ्या स्थानावर आला आहे. या दोघांनी अबु धाबीमध्ये भारतासाठी 140 धावांची भागीदारी केली. यापूर्वी डर्बनमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी 136 धावांची सलामी भागीदारी केली होती. तो सामना युवराज सिंहने इंग्लंड वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडवर मारलेल्या सहा षटकारांसाठी प्रसिद्ध आहे.
अबु धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर बुधवारी अफगाणिस्तानवर 66 धावांनी दणदणीत विजय नोंदवत भारताने टी-20 विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला. या विजयासह भारताने गट 2 मध्ये चौथ्या स्थानावर मजल मारली, तर पाकिस्तान क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघाला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील आणि गटातील पहिल्या दोन स्थानावर राहण्यासाठी इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. भारतीय संघाचा पुढील सामना शुक्रवारी दुबईत स्कॉटलंडशी होणार आहे.