विराट कोहली व मोहम्मद शमी (Photo Credit: PTI)

T20 World Cup 2021: टीम इंडियाने (Team India) अबू धाबी येथे 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग अफगाणिस्तान (Afghanistan) संघाला 66 धावांनी धूळ चारली आणि आपल्या चाहत्यांना दिवाळी देत टी-20 विश्वचषकमध्ये पहिला विजय साजरा केला आहे. विराट कोहलीच्या भारतीय संघाची (Indian Team) स्थिती अफगाणिस्तानविरुद्ध आजच्या सामन्यात ‘करो या मरो’ सारखी होती. अफगाणिस्तानविरुद्ध मोठ्या विजयासह भारताने टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सेमीफायनल फेरीत पोहोचण्याच्या आशा अजूनही पल्लवित आहेत. भारताच्या विजयात गोलंदाजांसह रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलच्या (KL Rahul) सलामी जोडीने मोलाची भूमिका बजावली.  त्यानंतर रिषभ पंत व हार्दिक पांड्याच्या फिनींशिंगने संघाने दोनशे पार धावांचा पल्ला गाठला. भारताने दिलेल्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाण संघ दबाव हाताळू शकला नाही आणि 144/7 धावाच करू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर अश्विनने 2 जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक गडी बाद केला. (IND vs AFG, ICC T20 World Cup 2021: ‘हिटमॅन’ रोहित शर्माची आक्रमक फलंदाजी, अफगाणिस्तानविरुद्ध ठोकले 23 वे टी-20 अर्धशतक)

अफगाणिस्तानला पहिला झटका मोहम्मद शमीने शहजादला खाते न उघडताच बाद करून दिला, तर बुमराहने हजरतुल्ला झझईला 13 धावांवर झेलबाद केले. रहमानउल्ला गुरबाज जडेजाच्या चेंडूवर पांड्याच्या हाती झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला. चार वर्षानंतर भारताच्या टी-20 प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केलेल्या रविचंद्रन अश्विनने गुलबदिनला 18 धावांवर एलबीडब्ल्यू करत भारताला चौथे यश मिळवून दिले. अनुभवी आश्विनने यंदाच्या विश्वचषकात पहिला सामना खेळत अप्रतिम कामगिरी सुरुच ठेवली आणि आणखी एक विकेट घेत अफगाणिस्तानचा पाचवा गडी तंबूत धाडला. त्याने नजीबुल्ला जदरानला त्रिफळाचित केलं. अफगाणिस्तान कर्णधार मोहम्मद नबीने मोक्याच्या क्षणी एकही अप्रतिम फटके लगावले. नबीचा 35 धावांचा डाव संघाला विजय मिळवून देण्यास पुरेसा नसला तरी त्याने संघाला मोठ्या फरकाने पराभवापासून वाचवले.

अफगाणिस्तान सध्या गट 2 मधील चार सुपर-12 सामन्यानंतर दोन विजय आणि तितक्याच पराभवासह 4 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. तर भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने चौकार-षटकारांची आतषबाजी करून 47 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 74 धावा केल्या. तसेच राहुलने 48 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. अखेरीस हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांनी अनुक्रमे 35 आणि 27 धावा करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. दरम्यान, टीम इंडियाचा पुढील सामना स्कॉटलंडविरुद्ध 5 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी सुपर-12 च्या अंतिम सामन्यात ते नामिबियाशी भिडतील.