T20 World Cup 2021: टीम इंडियाविरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेत ‘हा’ संघ आहे अजेय, वर्ल्ड टी-20 मधेही भारत नाही काढू शकला तोडगा
विराट कोहली (Photo Credit: PTI)

क्रिकेटच्या मैदानावर भारताचे (India) नेहमीच वर्चस्व राहिले आहे. 1983 मध्ये दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकल्यापासून, खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. टी-20, एकदिवसीय क्रिकेट असो किंवा कसोटी मॅच टीम इंडियाच्या नावावर सर्वाधिक रेकॉर्डची नोंद आहेत. टी-20 विश्वचषक 2007 मध्ये सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये तडाखेबाज कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) आयसीसी टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनवली होती आणि तेव्हापासून भारताच्या नशिबाने त्यांना या फॉरमॅटमध्ये नेहमीच पुढे नेले आहे. मात्र, या फॉरमॅटमध्ये असा एक रेकॉर्ड आहे जो टीम इंडिया मोडू पाहत आहे. आणि तो म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) पराभवाची मालिका. (IND vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंड संघावर संकट, टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजावर सामन्याबाहेर पडण्याची शक्यता)

युएई आणि ओमान येथे सुरु असेलेल्या टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या सुपर-12 आपल्या दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. यंदाच्या स्पर्धेच्या आपल्या सलामीच्या सामन्यात दोन्ही संघांना पराभवाचे तोंड पाहायला लागले होते. त्यामुळे हा सामना किवी व टीम इंडियासाठी आर-पारचा असणार आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंड हा एकमेव संघ असा आहे की ज्याला भारतीय संघ आयसीसी टूर्नामेंटमध्ये पराभूत करू शकलेला नाही. आतापर्यंत, भारत किवींना खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पराभूत करू शकला नाही आणि ब्लॅक कॅप्सविरुद्ध 0-5 असा रेकॉर्ड आहे. मात्र सौरव गांगुलीच्या नेतृत्वात 2003 विश्वचषकात भारताने सात विकेटने विजय मिळवला होता. गांगुलीच्या टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेत किवींना पराभूत करण्याची ती शेवटची वेळ होती. याशिवाय दोन्ही प्रतिस्पर्धी संघ 2007 आयसीसी विश्व टी-20, 2016 विश्व टी-20 आणि टी-20 विश्वचषक सामन्यात भिडले असून भारतावर किवी संघच वरचढ ठरला होता.

इतकंच नाही तर भारताने नुकत्याच झालेल्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्करली होती. तथापि आता ते आगामी टी-20 वर्ल्ड कप सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध आपला हिशोब बरोबर करू पाहत असतील.