ICC T20 विश्वचषक 2021 आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. काही दिवसातच क्रिकेट चाहत्यांसमोर चार सेमीफायनलिस्ट संघाचे चित्र स्पष्ट होईल. या स्पर्धेत 35 वा सामना वेस्ट इंडिज (West Indies) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात अबू धाबी येथे खेळला गेला. श्रीलंकेने हा सामना 20 धावांनी जिंकला आणि यासोबतच सध्याचा टी-20 विश्वचषक विजेता संघ वेस्ट इंडिजचा प्रवासावर ब्रेक लावला. वेस्ट इंडिजचा चार सामन्यांतील हा तिसरा पराभव असून या पराभवामुळे कॅरेबियन संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत किरोन पोलार्डच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजची कामगिरी अत्यंत खराब ठरली आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये पोलार्डच्या नेतृत्वातील वेस्ट इंडिजला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु सुपर 12 च्या चारपैकी तीन सामने गमावल्यामुळे संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. (T20 World Cup 2021: विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिजच्या 'ड्वेन ब्राव्हो'ची निवृत्तीची घोषणा)
गट 1 मध्ये फक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. त्याचबरोबर ग्रुप 1 मधून बांगलादेश (Bangladesh), श्रीलंका आणि आता वेस्ट इंडिज या तीन संघांचा प्रवास संपुष्टात आला आहे. दुसरीकडे, स्कॉटलंड गट 2 मधून बाहेर पडला आहे. तसेच सर्व चार सामने जिंकून बाबर आजमचा पाकिस्तानचा संघ गट 2 मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. दुसरीकडे, आता सेमीफायनलच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि भारत (जवळपास) असे संघ शर्यतीत आहेत. तसेच इंग्लंडने जवळपास उपांत्य फेरी गाठली आहे. अशा परिस्थितीत आता वरील संघापैकी कोणता संघ सेमीफायनलमध्ये एन्ट्री घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका सामन्याबद्दल बोलायचे तर नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकन संघाने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघ 20 षटकात 8 विकेट गमावून केवळ 169 धावाच करू शकला आणि 20 धावांनी सामना गमावला. विशेष म्हणजे या सामन्यात विंडीज संघातील शिमरॉन हेमायरने नाबाद 81 आणि निकोलस पूरनने 46 धावा करून दुहेरी आकडा गाठला. श्रीलंकेकडून चरित अस्लंकाने 68 धावा, सलामीवीर पथुम निसंका 51, कुसल परेराने 29 धावा आणि कर्णधार दासुन शनाकाने 14 चेंडूत 25 धावा केल्या. दुसरीकडे, कॅरेबियन संघाकडून आंद्रे रसेलने 2, तर ड्वेन ब्रावोने एक विकेट घेतली. 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. संघाने 10 धावांत दोन विकेट गमावल्या आणि त्यानंतर संघाला सावरता आले नाही. श्रीलंकेकडून बिनुरा फर्नांडो, चमिका करुणारत्ने आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.