T20 World Cup 2021: अंपायरच्या चुकीमुळेही पाकिस्तानला अंतिम फेरी गाठता आली नाही, ऑस्ट्रेलियन फलंदाजानेही केली मोठी घोडचूक
डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

ICC T20 World Cup 2021: डेव्हिड वॉर्नरने (David Warner) 49 धावा करत टी-20 विश्वचषकच्या (T20 WC) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या (Australia) आशा पल्लवित ठेवल्या. पण 11 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शादाब खानच्या (Shadab Khan) षटकात अंपायरने त्याला विकेटच्या मागे बाद घोषित केले. मात्र, रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागला नाही. ऑस्ट्रेलियाकडे 2 रिव्ह्यू बाकी होते, पण वॉर्नरने त्याचा उपयोग केला नाही आणि पॅव्हिलियनमध्ये परतला. यानंतरही पाकिस्तानचा (Pakistan) संघ विजय मिळवू शकला नाही. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानने 4 बाद 176 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19 षटकांत 5 गडी राखून लक्ष्य गाठले आणि फायनलमध्ये धडक मारली. आरोन फिंचच्या कांगारू संघाच्या विजयात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टोइनिस यांनी नाबाद खेळी केली. तर वॉर्नरने 30 चेंडूत 49 धावा केल्या. त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. (T20 World Cup 2021: मोहम्मद हाफीजने टाकला सर्वात खरा चेंडू, डबल बाऊन्स्ड चेंडूवर David Warner याने खेचला जबरदस्त षटकार)

10 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 बाद 89 अशी होती. यावेळी सामना बरोबरीत होता. मात्र वॉर्नर बाद होताच पाकिस्तान संघाने वर्चस्व गाजवले. पण वेड आणि स्टॉइनिस यांनी ऑस्ट्रेलियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. दरम्यान, वॉर्नरच्या विकेटने नेटकऱ्यांच्या नक्कीच भुवया उंचावल्या. बॉल आणि बॅटमध्ये खूप अंतर असल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट होतं. समालोचन करताना माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर म्हणाला की, बॉल बॅटला लागला नसल्याचं रिप्लेमध्ये दाखवत असलं, तरी काय झालं हे बॅट्समनला माहीत आहे. वॉर्नरला कळेल की चेंडू बॅटला लागला आहे. याच कारणामुळे त्याने डीआरएसचा वापर केला नाही. रिप्ले पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू काही करू शकले नाहीत. अशाप्रकारे वॉर्नरने पाकिस्तानला आपली विकेट गिफ्ट केली. पण बाबर आजमचा पाकिस्तान संघाला मोक्याच्या क्षणी पराभवाचे तोंड पाहायला लागले. यासह सुपर-12 मध्ये अजेय पाकिस्तानचा विजयरथ रोखण्यात ऑस्ट्रलिया यशस्वी झाला.

दरम्यान ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील विजेतेपदाचा सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबईत होणार आहे. 2010 मध्ये संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता. पण त्यांना इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे, केन विल्यम्सनचा न्यूझीलंड संघ पहिल्यांदाच ती-20 विश्वचषकच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत T20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकलेले नाही. त्यामुळे यंदा क्रिकेट विश्वाला नवा चॅम्पियन मिळणार आहे.