T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध बाबर आजमचा विक्रम मोडून Virat Kohli करणार पाकिस्तान कर्णधाराशी हिशोब चुकता
विराट कोहली आणि बाबर आजम (Photo Credit: PTI)

T20 World Cup 2021: UAE आणि ओमानमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार बाबर आजमने (Babar Azam) नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याच्या बाबतीत बाबरने भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या सामन्यात बाबरने ही कामगिरी केली. मात्र, आता भारतीय कर्णधार विराटला बाबरचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे. रविवारी न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) 2021 च्या दुसऱ्या सामन्यात बाबरचा विक्रम मोडून विराट पाकिस्तानच्या कर्णधाराशी हिशोब चुकता करू शकतो. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आपले सलामीची सामने गमावणाऱ्या भारत आणि किवी संघासाठी स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत आपली दावेदारी कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही संघात मजेदार लढत पाहायला मिळेल असे दिसत आहे. (IND vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय प्लेइंग XI वर Virat Kohli ने दिला मोठा अपडेट, पहा ‘विराट ब्रिगेड’चे संभाव्य 11 खेळाडू)

दरम्यान सध्या विराटने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 वेळा कर्णधार म्हणून 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय कर्णधाराने अर्धशतकही झळकावले होते. अशा स्थितीत दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर विराटने न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर तो बाबर आजमला मागे टाकेल. बाबरने देखील कर्णधार म्हणून या फॉरमॅटमध्ये 14 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 91 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 85 डावांमध्ये 3216 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 29 अर्धशतके ठोकली आहेत.

दुसरीकडे, कोहलीशिवाय अष्टपैलू हार्दिक पांड्याचे लक्षही एका विशिष्ट रेकॉर्डकडे असेल. जर हार्दिकने या सामन्यात चार षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 षटकार पूर्ण करेल. तसेच आणखी पाच धावा करताच तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 500 धावा पूर्ण करेल. हार्दिक सध्या खराब फॉर्मशी संघर्ष करत आहे. आयपीएलमधेही पांड्या मधल्या फळीत धावा करण्यात अपयशी ठरला होता. परिणामी मुंबई इंडियन्सला लीग फेरीतूनच बाहेर पडावे लागले. दरम्यान टी-20 विश्वचषकच्या सुपर-12 टप्प्यात भारतीय संघ गट-2 मध्ये 5 व्या स्थानावर आहे तर न्यूझीलंड त्यांच्यापेक्षा एक स्थान वर आहे. न्यूझीलंडलाही पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता.