T20 World Cup 2021: वर्ल्ड कपसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, ‘या’ ओव्हल कसोटी विजय नायकाला मिळणार संधी?
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

T20 World Cup 2021: आयसीसी (ICC) टी-20 विश्वचषक 2021 साठी टीम इंडियाची  (Team India) लवकरच घोषणा केली जाऊ शकते, पण वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) 15 सदस्यीय संघात समावेश कठीण दिसत आहे. इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यानंतर आज म्हणजेच मंगळवार 7 सप्टेंबर रोजी बीसीसीआय (BCCI) आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेसाठी संघाची घोषणा करणार आहे. निवड समिती, भारतीय संघाचे (Indian Team) मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा यांची व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे होणार मुलाखत होणार आहे, त्यानंतर भारतीय संघाची घोषणा केली जाईल. तथापि ब्रिटिश संघाविरुद्ध ओव्हलच्या मैदानात संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या शार्दूल ठाकूरचे वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. शार्दुल ठाकूरने 22 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9.11  ची इकॉनॉमी रेट आणि 22.29 च्या सरासरीने 31 विकेट्स घेतल्या आहेत. (T20 World Cup 2021: चार वर्षानंतर टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत परतणार ‘हा’ टेस्ट एक्स्पर्ट, वर्ल्ड कप संघात होऊ शकतो समावेश)

दरम्यान, ओव्हल कसोटीत (Oval Test) विजयानंतर भारताच्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदारांपैकी शार्दुल असला तरी भुवनेश्वर कुमार हा त्याच्यासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो कारण भुवी महत्त्वाच्या क्षणी विकेट घेण्यास तसेच गोलंदाजीत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. अशा स्थितीत शार्दुलला या वरिष्ठ गोलंदाजाची जागा टी-20 विश्वचषकात घेणे कदाचित अवघड होऊ शकते. भुवनेश्वर कुमारने 51 टी -20 सामन्यांमध्ये 6.90 च्या इकॉनॉमी रेट आणि 25.10 च्या सरासरीने 50 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच भुवनेश्वर कुमारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जास्तीत जास्त डॉट बॉल फेकण्यात शक्षम आहे. हेच कारण आहे की शार्दुलपेक्षा त्याचा इकॉनॉमी रेट खूप चांगला आहे. टी-20 मध्ये विकेट घेण्याव्यतिरिक्त, कमी धावा देणे देखील खूप महत्वाचे असते आणि भुवीला या कामात खूप अनुभव आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर भुवनेश्वर कुमारने इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत शानदार कामगिरी केली होती, श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने सर्वोत्तम इकॉनॉमी रेटने 5 विकेट घेतल्या होत्या. अशा स्थितीत ठाकूरचे यंदा टी-20 विश्वचषक खेळण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहू शकते.

दुसरीकडे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता बीसीसीआय 3 किंवा 5 खेळाडूंना राखीव म्हणून संघात समाविष्ट करू शकते. आयसीसीने केवळ 15 खेळाडूंची निवड करण्यास सांगितले आहे, ज्यांची काळजी क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेची जबाबदारी असेल. तथापि, आयसीसीने असेही म्हटले होते की, जर संघाला इतर खेळाडूंना आपल्यासोबत ठेवायचे असेल, तर त्याच मंडळाला त्यांची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल.