एमएस धोनी (Photo Credits: Getty Images)

कोरोना संकटा दरम्यान आयसीसीने सोमवारी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्थगित करण्याची घोषणा केली. यंदा ऑस्ट्रेलियामध्ये होणारे टी-20 वर्ल्ड कप 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आले. यामुळे कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या काही दिग्गज क्रिकेटपटूंच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केले आहे. टी-20 स्पर्धेनंतर क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी खेळातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता, पण आयसीसीने स्पर्धेला स्थगिती दिल्या या खेळाडूंना आपली निवृत्तीही काही काळ स्थगित करावी लागणार असे दिसत आहे. या खेळाडूंमध्ये एमएस धोनी (MS Dhoni), क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, ड्वेन ब्रावो, लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा समावेश आहे. आता स्पर्धेचे वेळापत्रक पुढे ढकलले गेले असल्याने हे दिग्गज खेळाडू पुढील वर्षी स्पर्धेत सहभाग घेऊ शकणार की नाही याचे आपण मूल्यांकन येथे करणार आहोत. ('IPL 2020 साठी टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलले', ‘मँकेगेट’चा संदर्भ देत 'या' पाकिस्तानी खेळाडूने BCCI, क्रिकेट ऑस्ट्रेलियावर केला आरोप)

आयसीसीने जाहीर केल्यानुसार टी-20 वर्ल्ड कप आता 2021 मधे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळले जाईल. हा निर्णय जाहीर करताना आयसीसीने पुढील तीन वर्ल्ड कपचा कालावधीही जाहीर केला. मात्र, आयसीसीच्या निर्णयामुळे धोनीसह अनेक दिग्गजांचे स्वप्न कदाचित भंग होणार आहे.

एमएस धोनी

त्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे आणि अद्याप धोनीच्या भवितव्याविषयी चित्र स्पष्ट झाले नाही. पुढील वर्षी वर्ल्ड कपपूर्वी धोनी 40 वर्षाचा होईल आणि त्याला स्पर्धेत खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयचा धाडसी ठरेल. पण, धोनीची त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून आहे आणि बीसीसीआय देखील भविष्य लक्षात घेऊनच निर्णय घेईल.

लसिथ मलिंगा

लसिथ मलिंगा हा तीन वनडे आणि दोन्ही टी-20 हॅटट्रिक घेणाराइतिहासातील एकमेव गोलंदाज आहे. पुढील वर्षी मलिंगा 38 वर्षाचा होईल आणि त्याच्या फिटनेसनुसारच त्याची संघात निवड होऊ शकते. 2019 विश्वचषकानंतर वनडे सामन्यातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मलिंगाने टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्तीची घोषणा केली परंतु त्याने निर्णय परत फिरवला आणि खेळत राहण्याचे जाहीर केले.

क्रिस गेल

'युनिव्हर्स बॉस' आणि विंडीजचा धडाकेबाज गेल टी-20 वर्ल्ड कप खेळण्यास उत्सुक होता. 2019 नंतर तो एकही टी-20 सामना खेळला नाही शिवाय पुढील वर्षी तो 42 वर्षाचा होणार असून त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

एबी डिव्हिलियर्स

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज यंदा निवृत्तीतून परत येत टी-20 खेळण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले जात होते, पण आयसीसीच्या निर्णयाने त्याच्या निर्णयावर पाणी फेरले. टी-20 विश्वचषकपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या कमीतकमी एका टी-20 मालिकेमध्ये डिव्हिलियर्स खेळणार आहे, अशी बातमी मिळाली होती, परंतु क्रिकेट फारच थोड्या वेळाने पुन्हा सुरू झाल्यामुळे डिव्हिलियर्सच्या योजना अनिश्चिततेच्या वातावरणात अडकल्या आहेत.

ड्वेन ब्रावो

वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज ब्रावोने देखील टी-20 वर्ल्ड कप खेळण्याहेतूने आपली निवृत्ती मागे घेतली होती. पण, पुढील वर्षी 38 वर्षाचा होणार ब्रावो टी-20 वर्ल्ड खेळण्याची शक्यता कमी आहे. विंडीज बोर्ड वर्ल्ड कप हेतूने संघ तयार करत आहे.

शोएब मलिक

आयसीसीच्या निर्णयाचा फटका पाकिस्तानच्या शोएब मलिकलाही बसला. मागील वर्षी वर्ल्ड कपमध्ये खराब खेळामुळे बाहेर पडलेल्या शोएबला यंदा बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीममध्ये स्थान देण्यात आले होते. शिवाय, पुढील वर्षी 39 वर्षीय शोएबला युवा पाकिस्तानी खेळाडूंच्या संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो.

दरम्यान, कोविड-19 मुळे यंदा होणारा टी-20 विश्वचषक पुढे ढकलण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) निर्णयाचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वागत केले. सध्याच्या वातावरणामध्ये 16 संघांचे आयोजन करण्यात महत्त्वपूर्ण धोका असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुनरुच्चार केले. ऑस्ट्रेलियाने यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन केले होते आणि पुरुषांच्या स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन करणे अपेक्षित होते.