Syed Mushtaq Ali Trophy 2021: अजिंक्य रहाणेच्या हाती मुंबईची धुरा, पृथ्वी शॉ उपकर्णधार; पहा संपूर्ण संघ
अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सय्यद मुश्ताक अली टी-20 (Syed Mushtaq Ali T20 Trophy) स्पर्धेत 20 सदस्यीय मुंबई संघाचे (Mumbai Squad) नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. तसेच आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स संघातील त्याचा साथीदार, युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) संघाचा उपकर्णधार असेल. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) सोमवारी भारताचे माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोलाच्या अध्यक्षतेखालील समितीने आपल्या वेबसाइटवर निवडलेल्या संघाची घोषणा केली. भारतीय वरिष्ठ देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने होणार आहे. ही टी-20 स्पर्धा 4 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना 22 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारताच्या वर्ल्ड कप संघात नसलेले अनेक सुपरस्टार खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील. तामिळनाडूने (Tamil Nadu) गेल्या हंगामात जेतेपद जिंकले होते आणि ते पुन्हा एकदा स्पर्धेत एक शानदार संघासह मैदानात उतरणार आहे.

दरम्यान, या स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) निवड समितीने 20 सदस्यीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवने गेल्या मोसमात संघाचे नेतृत्व केले होते, परंतु यंदा आंतरराष्ट्रीय करार बद्धतेमुळे तो अनुपलब्ध आहे. याशिवाय विजेता विजय हजारे ट्रॉफी संघाचे नेतृत्व करणारा पृथ्वी शॉ संघाचा उपकर्णधार असेल. रहाणे आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात एकही खेळ खेळला नाही आणि अनेक काळानंतर ही त्याची पहिली टी-20 स्पर्धा असेल. यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि सरफराज खान सारख्या खेळाडूंचाही संघात समावेश आहे. हे तिघेही अलीकडच्या इंडियन प्रीमियर लीग 2021 चा भाग होते, तर आदित्य तरेची संघाची यष्टीरक्षक म्हणून निवड झाली आहे. दुसरीकडे, ज्येष्ठ गोलंदाज धवल कुलकर्णी वेगवान हल्ल्याचे नेतृत्व करेल, तर तुषार देशपांडे आणि मोहित अवस्थी त्याला साथ देताना दिसतील.

मुंबई 20 पुरुष संघ

अजिंक्य रहाणे (कॅप्टन), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), आदित्य तरे, शिवम दुबे, तुषार देशपांडे, सरफराज खान, प्रशांत सोलंकी, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, धवल कुलकर्णी, हार्दिक तमोरे, मोहित अवस्थी, सिद्धेश लाड, साईराज पाटील, अमन खान, अरमान जाफर, यशस्वी जयस्वाल, तनुष कोटीयन, दीपक शेट्टी आणि रॉयस्तान डायस.