Niroshan Dickwella (Photo Credit - X)

Sri Lanka Cricket Team: श्रीलंका क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर (Sri Lanka Tour England) आहे. या दौऱ्यात श्रीलंकेला इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मालिका सुरू होण्याआधीच श्रीलंका क्रिकेटमधून एक वाईट बातमी समोर येत आहे. संघाच्या यष्टीरक्षक फलंदाजावर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून बंदी घालण्यात आली आहे. निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) असे या यष्टिरक्षकाचे नाव आहे. डिकवेला यांच्यावर डोपिंगविरोधी उल्लंघन केल्याचा आरोप आहे. डोप चाचणीत तो नापास झाल्याने त्याच्यावर अशी कठोर कारवाई करण्यात आली आहे. (हे देखील वाचा: SL vs ENG 2024: आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी श्रीलंकेने इयान बेलची नवीन फलंदाजी प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती)

क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटवर बंदी

नुकत्याच पार पडलेल्या लंका प्रीमियर लीगदरम्यान डोपिंगविरोधी उल्लंघन केल्याप्रकरणी निरोशन डिकवेलावर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर त्याच्यावर किती काळ बंदी घातली जाईल, हे कळेल, असे मानले जात आहे. श्रीलंका क्रिकेटने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे निरोशन डिकवेला यांच्यावरील बंदीची माहिती दिली आहे. श्रीलंका क्रिकेटच्या म्हणण्यानुसार, निरोशन डिकवेलावरील ही बंदी तात्काळ लागू झाली असून पुढील माहिती मिळेपर्यंत ती कायम राहील.

निरोशनने लंका प्रीमियर लीगमध्ये भूषवले कर्णधारपद 

31 वर्षीय श्रीलंकेचा यष्टिरक्षक फलंदाज निरोशनने लंका प्रीमियर लीगमध्ये गॅले मार्व्हल्स संघाचे नेतृत्व केले. तो शेवटचा मार्च 2023 मध्ये श्रीलंकेच्या संघाकडून खेळताना दिसला होता. या वर्षी बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली होती, जरी त्याला या मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. डिकवेला यापूर्वीही वादात सापडला आहे. 2021 च्या सुरुवातीला, कुसल मेंडिस आणि दनुष्का गुनाथिलका यांच्यासह त्याच्यावर देखील बायो बबल प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल बंदी घालण्यात आली होती. डिकवेला आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे.