IND vs SL 2020 T20I: भारत दौऱ्यासाठी श्रीलंका संघ जाहीर, 18 महिन्यानंतर अँजेलो मॅथ्यूज याचे पुनरागमन
श्रीलंका (Photo Credit: Getty Images)

टीम इंडिया (India) विरुद्ध रविवारपासून सुरु होणाऱ्या तीन टी-20 मालिकेसाठी श्रीलंका (Sri Lanka) संघ जाहीर करण्यात आला आहे. अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याचे श्रीलंकेच्या संघात पुनरागमन झाले आहे, तर दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज नुवान प्रदीप (Nuwan Pradeep) याला संघातून वगळण्यात आले आहे. शेहान जयसूर्या (Shehan Jayasuriya) याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. श्रीलंकेचा संघ लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याच्या नेतृत्वात 5 जानेवारीपासून भारतविरुद्ध मालिकेला सुरुवात करणार आहे. 18 महिन्यांनंतर टी-20 संघात परतलेल्या मॅथ्यूच्या अनुभवाचा श्रीलंकेच्या संघातील युवा खेळाडूंना फायदा होईल. टी -20 मध्ये भारताविरुद्ध श्रीलंकेची कामगिरी चांगली राहिली नाही. या दोघांमध्ये आतापर्यंत 6 द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. यामध्ये 5 मध्ये भारताने विजय विजय मिळवला, तर एक मालिका बरोबरीत राहिली. म्हणजेच श्रीलंकेचा संघ आतापर्यंत मालिका जिंकू शकलेला नाही.

भारत आणि श्रीलंकामध्ये एकूण 16 सामने खेळले गेले असून त्यापैकी भारताने 11 तर श्रीलंकेने पाच जिंकले आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना 5 जानेवारीला गुवाहाटीमध्ये खेळला जाईल. मालिकेचा दुसरा सामना 7 जानेवारी रोजी खेळला जाईल. मालिकेचा शेवटचा सामना 10 जानेवारी रोजी खेळला जाईल. पहिला सामना गुवाहाटीच्या मैदानावर, दुसरा सामना इंदोर आणि तिसरा सामना पुणेच्या स्टेडियममध्ये खेळला जाईल. याशिवाय, जर मालिकेतील तिन्ही सामने भारतीय संघाने जिंकले तर श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 14 सामने जिंकणारा पहिला संघ बनेल. टी-20 च्या एकूण रेकॉर्डबद्दल सांगायचे झाले तर टीम इंडिया दुसरा यशस्वी संघ आहे, तर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे.

असा आहे भारत विरुद्ध श्रीलंका संघ: लसिथ मलिंगा (कॅप्टन), कुसल परेरा, दनुष्का गुणथिलाका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, ओशादा फर्नांडो, दासुन शनाका, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, वनिंदू हसरंगा, लक्षन संदकन, धनंजया डी सिल्वा, लाहिरू कुमारा, ईसूरु उदाना.