Photo Credit - X

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पाकिस्तान संघाचा प्रवास संपला आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडियाकडून पराभव झाल्यानंतर, पाकिस्तानचा तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. रिझवानच्या नेतृत्वाखालील संघाची खराब कामगिरी पाहून संघावर सर्वत्र टीका होत आहे. दरम्यान, संघात मोठी फूट पडण्याची चिन्हेही दिसून येत आहेत. संघाचा सलामीवीर इमाम उल हकने एका पॉडकास्टमध्ये बोलताना एक मोठा खुलासा केला आहे. (हे देखील वाचा: PAK vs BAN 9th Match Abandoned Due to Rain: पाकिस्तानला आपला सन्मानही वाचवता आला नाही, पावसामुळे PAK विरुद्ध BAN सामना रद्द)

पाक संघात कर्णधारपदासाठी लढाई

काही महिन्यांपूर्वी मोहम्मद रिझवानला पाकिस्तानी संघाच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. यापूर्वी बाबर आझम संघाचा कर्णधार होता. इमाम म्हणाला, "माझ्या मनात नेत्याचे नाव येत नाहीये, सगळे आपापसात भांडत आहेत." यावर उत्तर देताना अँकर म्हणतो की मला तुमचा प्रामाणिकपणा आवडतो. तो हसत हसत हे बोलला असेल, पण त्यात काही तथ्य असल्याचे दिसते.

फखरच्या दुखापतीनंतर इमाम संघात सामील

2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या पाकिस्तानी संघात इमाम उल हकला स्थान मिळाले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फखर झमानला दुखापत झाली होती, त्यानंतर इमाम उल हकचा संघात समावेश करण्यात आला. भारताविरुद्धच्या सामन्यात तो काही खास कामगिरी करू शकला नाही आणि अक्षर पटेलने त्याला धावचीत केले.