टीम इंडियाच्या पहिल्या Day/Night टेस्टला मंजुरी मिळाल्यांनतर सौरव गांगुली याने मानले विराट कोहली चे आभार, जाणून घ्या काय आहे कारण
सौरव गांगुली, विराट कोहली (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघ 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर पहिला डे/नाईट टेस्ट मॅच खेळणार असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मंगळवारी जाहीर केले. दोन्ही देश पहिल्यांदा डे/नाईट टेस्ट खेळेल, त्यामुळे सर्वांमध्ये यासाठी उत्सुकता लागली आहे. दरम्यान, गांगुलीने याबाबत माहिती देत ही मोहीम यशस्वी करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे आभार मानण्यास वेळ गमावला नाही. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने संमती दिल्यावर आता भारतीय संघ 22 नोव्हेंबरपासून कोलकातामध्ये दोन्ही देशांच्या इतिहासातिल पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळण्याचा निर्णय घेतला गेला आहे. (IND vs BAN 2019: भारत दौऱ्यासाठी नवीन बांग्लादेश संघ जाहीर; शाकिब अल हसन वर बंदीनंतर 'या' खेळाडूंना मिळाली टी-20 आणि टेस्ट कर्णधारपदाची जबाबदारी)

गांगुली म्हणाले, "ईडन गार्डन्स भारताच्या इतिहासातील पहिला डे/नाईट कसोटी सामना आयोजित करेल याचा मला खूप सन्मान वाटतो. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनीही हा प्रस्ताव इतक्या कमी वेळात स्वीकारल्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. याशिवाय मला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांचेही आभार मानायचे आहे ज्याने आपला पाठिंबा दिला." गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्ष बनल्यानंतर विराटची भेट घेत डे/नाईट टेस्टबद्दल बोलणी केली होती. कोहलीने याच्या पक्षात असल्याचे म्हटले होते. पहिला डे/नाईट टेस्ट सामना ऑस्ट्रेलियाने आयोजित केला होता. त्यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध पहिला डे/नाईट टेस्ट सामना खेळला होता.

यापूर्वी, गांगुलीने म्हटले होते की, "बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने मंजुरी दिली आहे आणि आम्ही पिंक बॉल टेस्ट खेळणार आहोत. हे एक चांगले पाऊल आहे. कसोटी क्रिकेटला याची गरज होती. मी आणि माझी टीम यासाठी सज्ज आहोत." बोर्ड प्रतिनिधींनी ताबडतोब कंपनीशी बोलावे  आणि पुढील दहा दिवसात एसजी बॉल तयार करावे अशी अपेक्षा गांगुलीला आहे जेणेकरुन भारतीय आणि बांगलादेश संघाला डे-नाईट कसोटीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल.