West Indies A विरुद्ध तुफानी खेळी करत शुभमन गिल याने रचला इतिहास, गौतम गंभीर याचा 17 वर्षांचा विक्रम मोडत स्थापित केले नवीन कीर्तिमान
शुभमन गिल (Photo Credit: Shubhman Gill/Instagram)

भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याने वेस्ट इंडिज (West Indies) मध्ये तुफान आणलाय. विंडीज ए (West Indies A) विरुद्धच्या तिसर्‍या अनधिकृत टेस्टमध्ये गिलने शानदार फलंदाजी करत 250 चेंडूत 204 धावा फटकावल्या. असं करत शुभमनने टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याचा विक्रम मोडला आहे आणि काही नवीन विक्रम स्थापित केले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात तरुण दुहेरी शतक ठोकणारा शुभमन हा भारताचा पहिला फलंदाज ठरला. सध्या गिलचे वय 19 वर्षांचे 334 दिवस आहे. यापूर्वी हा विक्रम भारताच्या गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या नावावर होता. 2002 मध्ये गंभीरने झिम्बाब्वेविरुद्ध प्रेसिडेंट इलेव्हनकडून खेळताना गंभीरने द्विशतक झळकावले होते. त्यावेळी गंभीरचे 20 वर्ष आणि 124 दिवस होतं. (रवींद्र जडेजा याने जसप्रीत बुमराह याच्या बॉलिंगचे केले अनुसरण, हिटमॅन रोहितला देखील झाले हसू अनावर, पहा Video)

याशिवाय गिल आता परदेशी भूमीवर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. शिवाय, कॅरेबियन भूमीवर दुहेरी शतक ठोकणारा तो सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. गिलने आपल्या ऐतिहासिक खेळीदरम्यान 81.60 च्या स्ट्राईक रेटने 250 चेंडूत 19 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 204 धावा केल्या आणि संघाचा डाव सावरण्यास मोलाचे योगदान दिले. विंडीज ए विरुद्ध दुसऱ्या डावात शुभमनने हनुमा विहारी याच्यासाथीने पाचव्या विकेटसाठी 315 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, सध्याच्या विंडीज दौऱ्यासाठी गिलची भारतीय संघात (Indian Team) निवड झाली नाही. टीम इंडियाच्या विंडीज दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात शुभमन गिल आणि अनुभवी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांना वनडे किंवा टी-20 संघात स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यात गिल दोन वन डे सामने खेळला होता. त्यामुळे विंडीज दौऱ्यातील संघात त्याचे नाव सर्वांना अपेक्षित होते. शिवाय त्यानं भारत A संघाकडून विंडीज दौऱ्यात दमदार कामगिरीही केली होती.