Shreyas Iyer Injury Update: टीम इंडिया (Team India) फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) खांद्याच्या दुखापतीने सावरताना आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करून आपल्या दुखापतीवर अपडेट दिला आहे. यंदा वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध (England) मर्यादित ओव्हरच्या मालिकेदरम्यान क्षेत्ररक्षण करताना अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यामुळे त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या संपूर्ण हंगामातून माघार घेतली होती. त्याच्या अनुपस्थितीत, रिषभ पंतला आता-निलंबित आयपीएल हंगामासाठी दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर अय्यर आता सावरण्याच्या मार्गावर आहे आणि लवकरच जोरदार पुनरागमन करण्याची अपेक्षा आहे. पण त्याला आगामी श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळते की नाही यावर अद्याप संभ्रम कायम आहे कारण अय्यरने NCA मध्ये जाणे अपेक्षित आहे. (India Tour Of Sri Lanka 2021: श्रीलंका दौऱ्यावर भारताच्या कर्णधारपदासाठी ‘हे’ 3 स्टार खेळाडू असतील प्रमुख दावेदार, कोण मारणार बाजी?)
“काम प्रगतीपथावर. हे पाहा,” अय्यरने व्हिडिओला कॅप्शन दिले. या व्हिडिओमध्ये श्रेयस घरी वर्कआऊट करताना दिसत आहे. वेळेवर पूर्णत: सावरण्यात अपयशी ठरला तर कदाचित श्रेयसला श्रीलंका दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे. विराट कोहली- रोहित शर्मा यांच्यासारख्या तारांकित खेळाडूंशिवाय भारतीय संघ तीन वनडे आणि तितक्याच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत बहुतेक अव्वल खेळाडू व्यस्त असल्याने मालिकेसाठी बीसीसीआय दुसरा सर्वोत्तम संघ दौऱ्यासाठी निवडण्याच्या प्रक्रियेत आहे. अय्यर श्रीलंका दौर्यावर टीम इंडियाचे नेतृत्व करणारे अग्रगण्य उमेदवार आहे, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या आणि शिखर धवन संघाच्या कर्णधारपदाचे दावेदार आहेत.
View this post on Instagram
दुसरीकडे, श्रेयस आयपीएल 2021च्या उर्वरित सामन्यांपूर्वी फिटनेस परत मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. यंदा ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी बीसीसीआय आयपीएलच्या विंडोवर काम करत आहे. अय्यरच्या अनुपस्थितीत पंतने पहिल्या आठ सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला सहा मॅचमध्ये विजय मिळवून दिला आहे आणि नियमित कर्णधार परतल्यावर कर्णधारपदाची धुरा कोणाच्या हाती येते याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.