Shoaib Akhtar Apologised to MS Dhoni: शोएब अख्तरने एमएस धोनीकडे मुद्दाम फेकला होता बीमर, 14 वर्षानंतर भारतीय फलंदाजाची माफी मागितल्याचा केला खुलासा
शोएब अख्तर आणि एमएस धोनी (Photo Credit: Twitter)

पाकिस्तानी गोलंदाज आणि भारतीय फलंदाज यांच्या मधील मैदानावरील लढतीचा इतिहास फार जुना आहे. सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, नवजोत सिंह सिद्धू, सौरव गांगुलीविरुद्ध वकार युनूस, वसीम अकरम आणि शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांनी जबरदस्त कामगिरी केली आहेत. 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि नंतर 2000 च्या दशकात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि भारतीय फलंदाजांमध्ये तुफान स्पर्धा पाहायला मिळाली. कधीकधी भारतीय फलंदाज अख्तरवर भारी पडत, तर अनेकदा शोएब भारतीय फलंदाजांचे दांडूच उडवायचे. ही स्पर्धा वर्षानुवर्षे टिकली. सचिन असो, गांगुली किंवा वीरेंद्र सेहवाग असो, अख्तरने आपल्या धोकादायक गोलंदाजीने सर्वांना त्रास दिला होता. नुकतच यूट्यूब वाहिनीवर आकाश चोपडाशी (Aakash Chopra) झालेल्या संभाषणादरम्यान अख्तरने महेंद्र सिंह धोनीकडे (Mahendra Singh Dhoni) जाणीवपूर्वक बीमर टाकला आल्याच्या घटनेचा उल्लेख केला. (शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान वनडे क्रिकेटमधील 10 सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंची केली निवड; विराट कोहली-रोहित शर्मा Out)

2006 मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौर्‍यावर (India Tour of Pakistan) होता. फैसलाबाद कसोटी सामन्यादरम्यान ही घटना घडली. धोनी क्रीजवर जोरदार फलंदाजी करीत होता. एमएसने अख्तरच्या एका षटकात तीन चौकार ठोकले ज्यामुळे त्याच्यावर दडपणाखाली आले. त्यानंतर पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी बीमरने धोनीला बाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू वाईड गेला. शोएब म्हणाला की," मी फैसलाबादमध्ये 8-9 ओव्हर टाकले होते. हा वेगवान चेंडू होता आणि धोनीने शतक झळकावले. मी मुद्दाम धोनीकडे बीमर टाकला आणि नंतर माफी मागितली." अख्तर पुढे म्हणाला की, "मी प्रथमच बीमरचा हेतुपुरस्सर वापर केला. मी तसे करायला नको होते आणि मला याची खंत आहे. विकेटही स्लो होती आणि तो चांगला खेळत होता. मी ज्या वेगाने गोलंदाजी करीत होतो, त्याच वेगाने तो फलंदाजी करीत होता."

भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात धोनीने 148 धावांचे शानदार डाव खेळत आपल्या कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले होते. त्याच्या खेळीदरम्यान धोनीने 19 चौकार आणि चार षटकार लगावले होते. तथापि हा कसोटी सामना अनिर्णीत राहिला.