भारत दौऱ्यापूर्वी बांग्लादेशला मोठा धक्का; Shakib Al Hasan वर ICC ने घातली बंदी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Shakib Al Hasan (Photo Credits: Getty Images)

बांग्लादेशचा कसोटी आणि टी -20 कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दोन वर्षांसाठी बंदी (Ban) घातली आहे. यामुळे आता शाकिब 3 नोव्हेंबरच्या दौर्‍यावर येऊ शकणार नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) अटींचा भंग केल्याबद्दल शाकिबला 'कारणे दाखवा नोटीस' देण्यात आली होती. आता शाकिब एका नव्या अडचणीत सापडला आहे. बंगाली दैनिक 'समकाल' च्या वृत्तानुसार, एका बुकीने मॅच फिक्सिंगसाठी शाकिबकडे संपर्क साधला होता, मात्र शाकिबने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला याची माहिती दिली नाही. याच कारणामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

बंदीनंतर शाकिबने एक निवेदन जारी केले आहे ज्यामध्ये तो म्हणतो, 'मला सर्वात जास्त प्रिय असलेला खेळ खेळण्यास बंदी घातली आहे. परंतु मला मिळालेल्या ऑफर्सविषयी माहिती न दिल्याचे मला खूप वाईट वाटत आहे. माझ्यावरील बंदी मी पूर्णपणे स्वीकारतो. आयसीसीचे एसीयू (भ्रष्टाचारविरोधी युनिट) भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढ्यात मध्यवर्ती भूमिका बजावण्यासाठी क्रीडापटूंवर अवलंबून आहे आणि या प्रकरणात मी माझी जबाबदारी पूर्णपणे पार पडली नाही याचा मला खेद आहे.' (हेही वाचा: बांग्लादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याच्यावर भारत दौऱ्यातून बाहेर पडण्याची नामुष्की, जाणून घ्या कारण)

दरम्यान, जेव्हापासून शाकिबला कारणे दाखवा नोटीस मिळाली तेव्हापासून त्याने संघाच्या सराव सत्रात भाग घेतला नाही. बीसीबी अध्यक्ष नजमुल हसन यांनी आधीच सांगितले होते की, शाकिबने समाधानकारक उत्तर न दिल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. शाकिब अलीकडेच एम्बेसेडर म्हणून एका ग्रामीण फोन कंपनीशी जोडला गेला होता, आता यासंदर्भातील काम तो करू शकणार नाही.