भारतीय प्रसारमाध्यमांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास- शाहिद आफ्रिदी
पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी (Photo Credit: twitter/osmanuzair_pak_crik)

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने काश्मीर मुद्द्यावर एक वादग्रस्त विधान केले होते. यासंबंधित शाहिद आफ्रिदीचा पत्रकारांशी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यात आफ्रिदी म्हणाला होता की, "पाकिस्तानाला स्वतःचे प्रांत सांभाळता येत नाहीत तर काश्मीर काय सांभाळणार? "त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यावर आपला व्हिडिओ अर्धवट दाखवण्यात आला असल्याचं शाहिद आफ्रिदीने ट्विटरवरुन म्हटले आहे. पाहा शाहिद आफ्रिदीने केलेले वक्तव्य (व्हिडिओ)

सोशल मीडियावर असलेला व्हिडिओ अर्धवट आहे. काश्मीरवर मी ज्या अर्थाने वक्तव्य केलं होतं. तो अर्थच व्हिडिओत दाखवलेला नाही. काश्मीराचा मुद्दा हा संयुक्त राष्ट्रांसमोर प्रलंबित आहे. भारताच्या जुलमी सत्तेखाली काश्मीरचे लोक राहत आहेत. माझ्यासकट सर्व पाकिस्तानी नागरिक काश्मीर लोकांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्या पाठिशी आहोत. काश्मीर हे पाकिस्तानचेच आहे. अशा प्रकारचे ट्विट करुन आफ्रिदीने आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

त्याचबरोबर दुसरं ट्विट करत शाहिद आफ्रिदीने आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा दोष भारतीय प्रसारमाध्यमाना दिला आहे. या ट्विटमध्ये आफ्रिदी म्हणतो की, "माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ भारतीय प्रसारमाध्यमांनी लावला आहे. मी माझ्या देशाबद्दल अतिशय पॅशनेट असून मला काश्मीर लोकांच्या संघर्षाची किंमत आहे. माणूसकीचा विजय व्हायला हवा आणि त्यांना त्यांचे हक्क मिळायला हवेत."

आफ्रिदीच्या या ट्विट्सनंतर भारताकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.