T20 World Cup स्पर्धेने ‘या’ टीम इंडिया स्टार खेळाडूंनी केले पदार्पण आणि दुनिया मुठ्ठीत केली, यादीत मोठ्या नावांचा समावेश
भारत टी-20 वर्ल्ड कप (Photo Credit: Twitter/RCB)

भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) T20 विश्वचषक 2021 स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध सामन्याने करणार आहे. यंदा टीम इंडिया  (Team India) विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरणार आहे. सध्याच्या टीम इंडियात रनमशिन कर्णधार विराट कोहली, त्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma), रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, केएल राहुल असे बलवान फलंदाज आहेत. तसेच गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती अशा स्टार खेळाडूंचा समावेश आहेत. एशिअवय भारताकडे अनेक युवा चेहरे आहेत. पण या सर्वांनी किमान एक आंतरराष्ट्रीय T20 सामना खेळला आहे. पण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे काही स्टार खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकीर्दीची सुरुवात टी-20 विश्वचषकाने केली आणि आज संपूर्ण क्रिकेट विश्व काबीज केले आहे. आज आपण त्यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत. उल्लेखनीय आहे की यातील दोन खेळाडू यंदाच्या टीम इंडिया वर्ल्ड कप संघाचे सदस्य आहेत. (T20 World Cup 2021 मध्ये भारतासाठी ‘हे’ 3 खेळाडू ठरणार ‘गेम चेंजर्स’, पाकिस्तान विरोधात करणार धमाल)

1. युसूफ पठाण

आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या युसूफ पठाणने 2007 टी-20 विश्वचषकच्या फायनल सामन्यातून पदार्पण केले होते. वीरेंद्र सेहवाग जखमी झाला तेव्हा त्याला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली होती. युसूफने निराशा केली नाही आणि झटपट 15 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीही केली पण त्याला विकेट मिळाली नाही. यानंतर युसूफ भारतासाठी अनेक वर्षे खेळला.

2. रोहित शर्मा

सध्या भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहितने 2007 T20 विश्वचषकातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. रोहितने इंग्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला. यामध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुढील सामन्यात रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. त्यानंतर अंतिम फेरीत 30 धावांची नाबाद खेळी केली. तेव्हापासून तो भारतीय क्रिकेटचा एक महत्वपूर्ण भाग बनला आहे.

3. युवराज सिंह (Yuvraj Singh)

टीम इंडियाचा हा डावखुरा अष्टपैलू संघाच्या 2007 विश्वचषक विजयाचा नायक होता. युवराजने यापूर्वीच भारतासाठी वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते परंतु 2007 विश्वचषकद्वारे त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये पाऊल ठेवले. तो स्कॉटलंडविरुद्ध सामन्यातून बाहेर पडला होता. मात्र, पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. या सामन्यानंतर युवराजने इंग्लंडविरुद्ध एकाच षटकात सहा षटकारांचा कारनामा केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत 70 धावांची तुफानी खेळी केली.

4. गौतम गंभीर (Gautam Gambhir)

गंभीर 2007 टी-20 विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावले आणि संघाला मॅच-विनिंग धावसंख्या गाठण्यात महत्वाची भूमिका बजावली. गौतम गंभीरनेही स्कॉटलंडविरुद्ध सामन्यात टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

5. मोहम्मद शमी (Mohammed Shami)

टीम इंडियाच्या या वेगवान गोलंदाजाने वर्ल्ड कप स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण  केले होते. मोहम्मद शमीने 2014 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामन्यात पदार्पण केले होते. या सामन्यात शमीने एक विकेट घेतली. मोहम्मद शमी अजूनही भारताकडून खेळत आहे. आणि यंदाच्या टी-20 विश्वचषक 2021 मध्ये तो भारताचा मुख्य गोलंदाज असेल.

6. जोगिंदर शर्मा (Joginder Sharma)

टी-20 विश्वचषक 2007 स्पर्धेच्या फायनल सामन्यात शेवटचे षटक टाकून भारताला विजय मिळवून देण्यासाठी हा खेळाडू लक्षात राहतो. पण जोगिंदर शर्माने 2007 टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतून पदार्पण केले. त्याने इंग्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला. या सामन्यात तो महागडा ठरला आणि इंग्लंडने त्याच्या चार षटकांत 57 धावा लुटल्या. पण त्याने पुढचे सामनेही खेळले आणि मग इतिहास घडला.