Asia Cup 2022: रोहित शर्माने सचिन तेंडुलकरला टाकले मागे, आशिया कपमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मंगळवारी आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. आशिया कपच्या इतिहासात 1000 धावा पूर्ण करणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. आशिया कप सुपर फोरमधील श्रीलंकेविरुद्धच्या (IND vs SL) तिसऱ्या सामन्यात रोहितने ही कामगिरी केली. आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्माने सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकरने आशिया कपमध्ये 23 सामन्यात 971 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत सचिनने त्याच्या सर्व धावा वनडे फॉरमॅटमध्ये केल्या. रोहित आता सर्वकालीन यादीत श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आणि कुमार संगकारा यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

रोहितनंतर या यादीत चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर, तर विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. आशिया चषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारत आणि श्रीलंकेच्या फलंदाजांचे वर्चस्व आहे. कर्णधार रोहित शर्माने 41 चेंडूत शानदार 72 धावा केल्या, ज्याच्या बळावर भारताने आशिया कप सुपर फोरमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 8 बाद 173 धावा केल्या. (हे देखील वाचा: IND vs SL, Asia Cup 2022: भारत अंतिम फेरीत कसा पोहोचेल? श्रीलंकेला हरवूनही जागा निश्चित नाही!)

पहिल्या दोन विकेट लवकर गमावल्यानंतर रोहितने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि पाच चौकार आणि चार षटकार ठोकले. त्याला सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत 34 धावा करत चांगली साथ दिली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 97 धावा जोडल्या. रोहित बाद झाल्यानंतर मात्र भारतीय फलंदाजांना केवळ 63 धावाच करता आल्या. एका वेळी 13व्या षटकात रोहित आऊट झाला तेव्हा भारताची धावसंख्या तीन बाद 110 अशी होती.