Rohit Sharma (Photo Credit - X)

मुंबई: रोहित शर्माने (Rohit Sharma) गेल्या काही वर्षांत त्याच्या फलंदाजीची शैली पूर्णपणे बदलली आहे. तो क्रीजवर येताच आक्रमक फलंदाजी करतो आणि जलग गतीने धावा करतो. धावगती वेगवान ठेवण्यावर त्याचे लक्ष असते. त्यामुळे नंतर येणाऱ्या फलंदाजांवरील दडपण कमी होते. गेल्या दशकात त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने भारताला अनेक हरवलेले सामने जिंकून दिले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN Test Series 2024: बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी 'हिटमॅन'ची जबरदस्त तयारी, मैदानात गाळत आहे घाम (पाहा व्हिडिओ)

वीरेंद्र सेहवागची विक्रम मोडण्याची संधी

रोहित शर्माने भारतासाठी 59 कसोटी सामन्यांमध्ये 84 षटकार ठोकले आहेत. तो सध्या भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. वीरेंद्र सेहवाग पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 90 षटकार मारले आहेत. आता जर रोहितने बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आणखी 7 षटकार मारले तर तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनेल आणि सेहवागचा विक्रम मोडेल.

भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज:

वीरेंद्र सेहवाग- 90

रोहित शर्मा - 84

महेंद्रसिंग धोनी- 78

सचिन तेंडुलकर- 69

रवींद्र जडेजा- 64

बेन स्टोक्सने कसोटीत मारले आहेत सर्वाधिक षटकार 

कसोटी क्रिकेटच्या एकूण इतिहासावर नजर टाकली तर इंग्लंडचा बेन स्टोक्स हा सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. त्याने 131 षटकार मारले आहेत. ब्रेंडन मॅक्क्युलम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 107 षटकार मारले आहेत. रोहित शर्माने 2013 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने कारकिर्दीतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतके झळकावली. आतापर्यंत त्याने भारतासाठी 59 कसोटी सामन्यांमध्ये 4137 धावा केल्या आहेत ज्यात 12 शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे.

डब्ल्यूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर 

सप्टेंबरमध्ये होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा एक भाग आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. संघाने आतापर्यंत 6 सामने जिंकले आहेत आणि त्याचा पीसीटी 68.52 आहे. तर बांगलादेशचा संघ सातव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशने 2 कसोटी सामने जिंकले आहेत आणि त्याचे पीसीटी 35.00 आहे.