Road Safety World Series 2020 Traffic Advisory: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजनिमित्त मुंबई पोलिसांनी केले वाहतुकीमध्ये बदल; आज वानखेडे स्टेडियमवर भिडणार सचिन तेंडूलकर आणि ब्रायन लारा
Former cricketers (Photo Credits: worldseriest20.com)

अनअॅकॅडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचे (Unacademy Road Safety World Series) दोन सामने 7 व 8 मार्च रोजी मुंबईमध्ये (Mumbai) खेळले जात आहेत. आजच्या पहिल्या सामन्यात, सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) इंडिया लेजेंड्सचा सामना ब्रायन (Brian Lara) लाराच्या विंडीज लेजेंड्ससोबत होणार आहे. हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. मुंबईमधील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) हा सामना पार पडणार आहे. या सामन्यासाठी होणारी वाहनांची आणि लोकांची गर्दी पाहता, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत.

हे बदल 7 व 8 मार्च रोजी, दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत लागू असतील. यातील बरेचसे मार्ग वन वे ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी नमूद केलेल्या रस्त्यांवर आपत्कालीन सेवांची वाहने सोडून इतर कोणत्याही वाहनांसाठी पार्किग सुविधा उपलब्ध नसणार आहे. मात्र पोलिसांनी 8 ठिकाणी पे आणि पार्कची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

दरम्यान, या मालिकेत एकूण 11 सामने खेळले जातील. सचिन आणि ब्रायन लारा व्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध परदेशी खेळाडूही या मालिकेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेत भारत, श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह 5 देशांचे माजी खेळाडू सहभागी होत आहेत. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणार्‍या सचिनसाठी हा एक भावनिक क्षण असेल, कारण सचिन 14 नोव्हेंबर 2013 नंतर वानखेडे स्टेडियमवर प्रथमच खेळणार आहे. सचिनच्या चाहत्यांसाठीही मोठी पर्वणी ठरणार आहे. (हेही वाचा: ICC Women’s T20 World Cup 2020 FINAL: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्याकडून भारतीय महिला क्रिकेट संघाला विजयी सल्ला)

या सीरीजचा अंतिम सामना 22 मार्च रोजी खेळला जाईल. या मालिकेदरम्यान खेळले जाणारे सामने कलर्स सिनेप्लेक्सवर थेट पाहिले जाऊ शकतात. त्याचबरोबर हे सामने इंटरनेटवर जिओ क्रिकेट आणि व्हूटच्या माध्यमातून पहिले जाऊ शकतात. भारतात दर चार मिनिटांत रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यामुळे या मालिकेचा उद्देश लोकांना रस्ता सुरक्षिततेबद्दल जागरूक करणे हा आहे.