RCB vs SRH, IPL 2020: हैदराबादच्या भेदक गोलंदाजीपुढे आरसीबी फलंदाजांची शरणागती, RCB चे सनरायझर्ससमोर विजयासाठी 121 धावांचे लक्ष्य
जोश फिलिप (Photo Credit: PTI)

RCB vs SRH, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आजच्या दुसऱ्या डबल-हेडर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) टॉस जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. हैदराबाद आणि बेंगलोर यांच्यातील आजचा सामना शारजाह (Sharjah) येथे खेळला जात आहे. पहिले फलंदाजी करत आरसीबीने (RCB) 7 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 120 धावा केल्या. आजच्या सामन्यात एकही आरसीबी फलंदाज मोठा डाव खेळू शकला आणि हैदराबादच्या गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली. आरसीबीकडून जोश फिलिपने (Josh Phillipe) सार्वधिक 32 धावा केल्या. एबी डिव्हिलिअर्सने 24 आणि वॉशिंग्टन सुंदरने 21 धावांचे योगदान दिले. सनरायझर्ससाठी संदीप शर्मा (Sandeep Sharma) आणि जेसन होल्डर (Jason Holder) यांनी सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. टी नटराजन, शाहबाझ नदीम, आणि राशिद खान यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (RCB vs SRH, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

हैदराबादसाठी गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि आरसीबीच्या धावगतीवर वेसण घातली. टॉस गमावून पहिले फलंदाजीला आलेल्या बेंगलोरला देवदत्त पडिक्कलच्या रूपात पहिला झटका बसला. संदीप शर्माने देवदत्तला 5 धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर संदीपने आयपीएलमध्ये सातव्यांदा विराट कोहलीची विकेट काढली. विराट 7 धावांवर बाद झाला. डिव्हिलियर्स 24 धावा करून नदीमच्या चेंडूवर अभिषेक शर्माकडे कॅच आऊट होत पॅवेलियनमध्ये परतला. टिकून खेळणाऱ्या जोश फिलिपला 32 धावांवर राशिद खानने मनीष पांडेकडे झेलबाद केले. वॉशिंग्टन सुंदर नटराजनचा शिकार बनला. त्याने 21 धावा केल्या. मॉरिस देखील खास कामगिरी करू शकला नाही आणि 3 धावांवर माघारी परतला. इसुरु उदानाला भोपळाही न फोडू देता होल्डरने माघारी धाडलं.

दरम्यान, आजच्या सामन्यासाठी हैदराबादने टीममध्ये एक बदल केला आहे. विजय शंकरच्याऐवजी अब्दुल समदला संधी देण्यात आली आहे, तर बेंगलोरने डेल स्टेनच्याऐवजी इसरू उदाना आणि शिवम दुबेच्या जागी नवदीप सैनीचा समावेश केला आहे.