प्रवीण कुमार (Photo Credit: Getty)

अलिकडच्या काळात जगातील अनेक बड्या क्रिकेटपटूंनी मानसिक तणाव आणि इतर समस्यांमुळे खेळातून काही काळ ब्रेक घेतला आहे. मागील वर्षी अशी प्रकरणं चांगलीच ऐकायला मिळाली आणि खेळाडूंनीही यावर उघडपणे भाष्य केले. द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत माजी भारतीय (India) वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार (Praveen Kumar) ने कबूल केले आहे की, काही महिन्यांपूर्वी नैराश्याने ग्रासले असता त्याला आपले जीवन संपवायचे होते. निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यावर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कुमारने निवृत्ती जाहीर केली. त्याने मानसिक आरोग्याच्या समस्यांसह आणि एकाकीपणासाठी संघर्ष केला. त्यानंतर त्याला मानसिक आरोग्याच्या (Mental Health) समस्यांसह आणि एकाकीपणाने संघर्ष करावा लागला. पण, वैयक्तिकरित्या आयुष्याकडे परत जाण्याचा प्रयत्न करीत असलेला प्रवीण सध्या थेरपी घेत आहे. कुमार शेवटी भारताकडून खेळत असताना आता जवळजवळ 8 वर्षे झाली आहेत. आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर जगातील फलंदाजांच्या मनात भीती निर्माण करणारा भारताचा वेगवान गोलंदाज कुमारही मानसिक समस्यांशी झगडत असल्याचे समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारताकडून 84 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा प्रवीण दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या करण्यासाठी प्रेरित झाला होता. प्रवीणने 'इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितले, "मी स्वत: ला सांगितले,'काय आहे हे? बस सम्पवूया आता." हरिद्वारकडे जाणाऱ्या महामार्गावर त्यावेळी गाडी चालवत प्रवीणने रिवॉल्व्हरने स्वत:ला ठार मारण्याचा विचार केला होता, मात्र नंतर आपल्या मुलांचा फोटोपाहून त्याने निर्णय बदलला. तो पुढे म्हणाला, "माझ्या लक्षात आले की मी माझ्या निरपराध मुलांबरोबर असे करू शकत नाही, त्यांना या नरकात टाकू. मी मागे वळालो." या घटनेनंतर कुमार त्याच्या मानसिक अवस्थेत मदत घेण्यास उद्युक्त झाला. लवकरच कुमारला नैराश्याचे निदान झाल्याचे समजले. दरम्यान, आपल्या भविष्यातील महत्त्वाकांक्षांबद्दल बोलताना कुमारने म्हटले की क्रिकेट कोचिंग ही त्याच्यासाठी सर्वात महत्वाची वाट आहे.

प्रवीणने भारताकडून 6 कसोटी सामने, 68 एकदिवसीय आणि 10 टी -20 सामने खेळले आहेत. मार्च 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शेवटचा सामना होता. यापूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहलीने मानसिक आरोग्याबाबत बोलताना भाष्य करत 2014 च्या इंग्लंड दौऱ्याची आठवण केली. शिवाय, ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसल्यामुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता.