पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात रावळपिंडीमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे. अनेक वर्षानंतर पाकिस्तानमध्ये टेस्ट क्रिकेटचे आगमन झाल्यानंतर ही पहिली मालिका खेळली जात आहे. आबिद अली (Abid Ali) कसोटी आणि वनडे सामन्यात शतक झळकावणारा पाकिस्तान पहिला फलंदाज ठरला. या शतकाच्या जोरावर या पाकिस्तानी फलंदाजाने आपल्या नावावर विश्वविक्रम नोंदवून मोठा इतिहास रचला आहे. वनडे आणि कसोटी सामन्यात शतक ठोकणारा आबिद जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. यावर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध वयाच्या 32 व्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानी फलंदाज अबिदने शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेच्या चौथ्या वनडे सामन्यात आबिदने 119 चेंडूत 112 धावा केल्या होत्या. आणि आता त्याने श्रीलंकेविरुद्ध रावळपिंडी (Rawalpindi) मधील पहिल्या मॅचमधून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
आबिद हा जगातील एकमेव खेळाडू आहे ज्याने वनडे आणि टेस्टच्या पहिल्या सामन्यात शतक ठोकले आहे. अद्याप कोणत्याही फलंदाजाने ही आश्चर्यकारक कामगिरी केलेले नाही. डेब्यू कसोटी सामन्यात 106 फलंदाजांनी शतक ठोकले आहे, तर 15 क्रिकेटर्सने वनडेमध्ये शतकं केली आहेत. याशिवाय टी-20 पदार्पण सामन्यात फक्त 3 खेळाडूंनी शतके ठोकली आहेत. पाकिस्तान संघाकडून 4 वनडे सामने खेळलेल्या आबिदने या चार सामन्यात शतक आणि अर्धशतकांसह 191 धावा केल्या आहेत. पदार्पण कसोटीत शतक ठोकणारा तो पाकिस्तानचा 12 वा फलंदाज आहे.
💯 on ODI debut ✅
💯 on Test debut ✅
Well done @AbidAli_Real 👏👏👏#PAKvSL pic.twitter.com/aTblVb7wZa
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 15, 2019
श्रीलंकाविरुद्ध सध्या सुरु असलेल्या या मॅचबद्दल बोलले तर, सामन्याच्या पाचव्या दिवशी श्रीलंकेने 6 विकेट्स गमावून 308 धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानने अखेरच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्सवर 252 धावा केल्या. शान मसूद 0 तर कर्णधार अझर अली 36 धावांवर बाद झाला. रावलपिंडी कसोटीच्या शेवटच्या दिवशी बाबर आझम याने नाबाद 102 धावा केल्या. पावसामुळे बहुतेक खेळ होऊ शकले नाहीत आणि अखेरीस हा सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघातील अंतिम सामना 19 डिसेंबरला कराचीमध्ये खेळला जाईल.