(Image Credit: PTI)

श्रीलंका क्रिकेट संघातील बहुतेक ज्येष्ठ खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान दौर्‍यावर मर्यादित ओव्हरची मालिका खेळायची आहे. बीबीसी उर्दूच्या (BBC Urdu) वृत्तानुसार वनडे कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne), टी-20 कर्णधार लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) या ज्येष्ठ खेळाडूंनी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेचे क्रीडामंत्री हेरिन फर्नांडो यांनी बीबीसीला सांगितले की, बर्‍याच खेळाडूंच्या कुटुंबियांनी सुरक्षेच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, संघाचे अधिकारी खेळाडूंची भेट घेतील आणि पाकिस्तान दौर्‍यासाठी तेथे त्यांना पूर्ण सुरक्षा देण्यात येईल, याची खात्री पटवून देतील. या संदर्भात 9 सप्टेंबर रोजी बैठक होण्याची शक्यता आहे.

फर्नांडो म्हणाले, "काही खेळाडूंनी मला सांगितले की ते या दौर्‍याचा भाग होऊ शकत नाहीत कारण त्यांच्या कुटुंबीयांनी सुरक्षा परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मीही त्यांना सांगितले आहे की मी देखील त्यांच्याबरोबर पाकिस्तान दौर्‍यावर जाण्यास तयार आहे." दरम्यान, पाकिस्तानने श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या या होम सिरीजच्या तारखांची घोषणा केली आहे. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर 27 सप्टेंबर, 29 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबरला पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल.

यानंतर दोन्ही संघ 5, 7 आणि 9 ऑक्टोबर रोजी लाहोरच्या गधाफी स्टेडियमवर तीन सामन्यांची टी -20 मालिका खेळतील. यानंतर श्रीलंका\देखील डिसेंबरमध्ये दोन सामन्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पाकिस्तानचे यजमानपद भूषविणार आहे.