(Image Credit: BCCI Twitter)

भारतीय क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय (BCCI) सध्या टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफच्या शोधात आहे. विश्वचषकनंतर बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक आणि अन्य प्रमुख पदांसाठी अर्ज मागवले होते. 30 जुलै, मंगळवारी या पदांसाठीची अर्ज करण्याची मुदत संपली असून रवि शास्त्री (Ravi Shastri) यांच्या पदावर दावा सांगण्यासाठी पाच जणांचे अर्ज आले आहेत. पण बंगळुरू मिरर, या वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार मुख्य प्रशिक्षकपदासाठी जवळपास 2000 अर्जदार समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्री यांच्या पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी (Tom Moody), न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन (Mike Hesson), भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंह (Robin Singh) आणि भारताचे माजी व्यवस्थापक लालचंद राजपूत (Lalchand Rajput) या पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पण पूर्वी या भूमिकेसाठी आपली आवड दाखवलेल्या श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू माहेला जयवर्धने यांनी अद्याप अर्ज पाठविला नाही. (टीम इंडियासाठी प्रशिक्षक निवडताना विराट कोहली याच्या मताचा विचार करणे बंधनकारक नाही: CAC सदस्य अंशुमन गायकवाड)

यंदा मुख्य प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी ही भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समितीकडे आहे. आणि या प्रक्रियेत विराट कोहलीचे मत घेतले जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. मिररने असेही म्हटले आहे की अनेक आंतरराष्ट्रीय इच्छुकांनी त्यांच्या एजंट्सद्वारे अर्ज पाठवले आहे आणि सर्व नावाचे मूल्यांकन करण्यासाठी बीसीसीआय अधिक वेळ घेऊ शकते. दरम्यान, भारतीय संघाच्या मुख्य पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपली आहे. आणि  आता लवकरच या अर्जदारांची मुलाखत घेतली जाणार आहे.

यांच्याशिवाय भारताचे माजी टेस्ट क्रिकेटपटू प्रविण आम्रे (Pravin Amre) यांनी फलंदाजी प्रशिक्षक, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जाँटी ऱ्होड्सने (Jonty Rhodes) यांनी क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत.