टीम इंडियासाठी प्रशिक्षक निवडताना विराट कोहली याच्या मताचा विचार करणे बंधनकारक नाही: CAC सदस्य अंशुमन गायकवाड
Virat Kohli and Ravi Shastri | (Photo Credits: Twiteer/ANI)

भारतीय संघाच्या (Indian Team) मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांच्या नवीन नियुक्तीसाठी बीसीसीआय (BCCI) कडून अर्ज मागवण्यात आले होते. टीम इंडियाच्या या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून आता माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीमध्ये कपिल देव यांच्याशिवाय माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगस्वामी (Shanta Rangaswamy) आहेत. संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत वाढवण्यात आला होता. विंडीजविरुद्ध टी-20 मालिकांसाठी अमेरिकेला रवाना होण्याआधी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला कोच पदासाठी त्याची पसंती विचारण्यात आली असता त्याने शास्त्रींना आपले मत दिले. (टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी Virat Kohli याची रवी शास्त्री यांना पसंती; हर्षा भोगले आणि आकाश चोप्रा यांनी दिल्या हटके प्रतिक्रिया)

यावर हर्षा भोगले आणि माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी आक्षेप घेतला. आणि आता क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी हे स्पष्ट केले आहे की जेव्हा ते निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी बसतील तेव्हा ते हे कार्य मुक्त मनाने करतील. ''भारतीय संघासाठी योग्य व्यवस्थापक आणि दूरदृष्टी असलेली व्यक्ती हवी. हे दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. याशिवाय अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेतच. तांत्रिक ज्ञानही गरजेचे आहे,'' असे गायकवाड यांनी सांगितले.

दुसरीकडे, पुढील प्रशिक्षक निवडण्यापूर्वी समिती कोहलीचे विचारात घेईल का विचारले असता गायकवाड म्हणाले की हे बंधनकारक नाही. ''आम्ही महिला क्रिकेट संघासाठी प्रशिक्षक निवडला, त्यासाठी आम्ही कोणाकडून मदत घेतली नाही. त्यामुळे पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीसाठी कोणाचा सल्ला घेणे बंधनकारक नाही. बीसीसीआयवर सर्व अवलंबून आहे आणि त्यासंदर्भात बीसीसीआयसोबत चर्चाही झालेली नाही,'' गायकवाड म्हणाले.