On This Day in 2019: वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची शेवटची मॅच ठरली MS Dhoni याचीही अखेरची, आजच्या दिवशी तुटली होती लाखो क्रिकेटप्रेमींची मने

On This Day in 2019: तब्बल 2 वर्षांपूर्वी, 10 जुलै 2019 रोजी भारताचा दिग्गज कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) जवळपास 15 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा अनधिकृत अंत झाला होता. दोन वेळा विश्वचषक विजेता कर्णधार धोनी न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) 2019 वर्ल्ड कप (World Cup) सेमीफायनल सामन्यात अंतिम वेळा भारतीय जर्सीत  (Indian Jersey) मैदानात उतरला होता आणि आजच्याच दिवशी लाखो क्रिकेटप्रेमींची मने तुटली जेव्हा किवी संघाकडून टीम इंडियाला (Team India) पराभव पत्करावा लागला. इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या वनडे वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात पावसाच्या कृपेमुळे धोनी 9 आणि 10 जुलै असे दोन दिवस मैदानात उतरला. पहिल्या दिवशी टीम इंडिया आपल्या कामगिरीवर समाधानी असली तरी दुसर्‍या दिवसाच्या खेळामुळे आयसीसी (ICC) स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याचे त्यांचे स्वप्न भंग झाले. (MS Dhoni IPL Retirement: पुढील वर्षी CSK कर्णधाराने निवृत्ती घेतल्यास ‘हा’ आयपीएल दिग्गज देखील धोनीचे अनुसरण करण्यास तयार)

न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने अवघ्या पाच धावांवर तीन विकेट्स गमावल्या. धोनीच्या क्रीजवर येईपर्यंत भारत लक्ष्याचा पाठलाग करताना संघर्ष करत होता. 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या धोनीने भारताच्या आशा पल्लवित ठेवल्या आणि 72 चेंडूत 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली ज्यामुळे 92 धावांवरून 208 पर्यंत मजल मारली. अखेरच्या 12 चेंडूत 31 धावांची गरज असताना धोनीवर सर्वांच्या आशा टिकून होत्या. पण, मार्टिन गुप्टिलच्या अचूक थ्रोने धोनीला माघारी धाडलं व सलग दुसर्‍या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा प्रवेश निश्चित केला. अशाप्रकारे भारताच्या आशा संपुष्टात आल्या. धोनी 72 चेंडूत 50 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.

धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा अनधिकृत अंत ठरला कारण त्यानंतर त्याने 2019/20 च्या उर्वरित हंगामात विश्रांतीची निवड केली. आयपीएल 2020 साठी चेन्नई सुपर किंग्सच्या शिबिरात धोनीने अखेर 15 ऑगस्ट रोजी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. धोनीने आपल्या शानदार कारकिर्दीत 90 कसोटी सामने, 350 एकदिवसीय सामने आणि 98 टी-20 सामने खेळले. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप, वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा धोनी आजवरचा एकमेव कर्णधार ठरला आहे.