MS Dhoni IPL Retirement: पुढील वर्षी CSK कर्णधाराने निवृत्ती घेतल्यास ‘हा’ आयपीएल दिग्गज देखील धोनीचे अनुसरण करण्यास तयार
एमएस धोनी आणि सुरेश रैना (Photo Credit: Instagram)

MS Dhoni IPL Retirement: भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) 15 ऑगस्ट, 2020 रोजी एमएस धोनीच्या (MS Dhoni) निवृत्तीचे अनुसरण करत आपल्या चाहत्यांना धक्का दिला. धोनी आणि रैना चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) 2020 आयपीएल  (IPL) शिबिरात दाखल झाले होते जेव्हा चेन्नई सुपर किंग्स कर्णधाराने निवृत्तीची घोषणा केली. आता रैनाची आयपीएल कारकीर्दही धोनीवर अवलंबून आहे. धोनी पुढच्या वर्षी आयपीएल सोडल्यास आपणही टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होऊ असे भारताच्या माजी प्रभारी कर्णधाराने म्हटले. News 24 शी बोलताना रैनाने सांगितले की येलो आर्मीने यंदाची स्पर्धा जिंकल्यास तो सीएसकेच्या (CSK) कर्णधाराला आयपीएल 2022 खेळायला पटवून देईल. (IPL 2021: इंग्लंड-न्यूझीलंड खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्पूयातून बाहेर पडल्यास या 3 संघाचे होणार मोठे नुकसान)

“पुढच्या वर्षी धोनी आयपीएल खेळला नाही तर मी देखील खेळणार नाही. आम्ही 2008 पासून एकत्र खेळलो आहोत. आणि यावर्षी आयपीएल जिंकल्यास मी पुढचा हंगामही खेळायला त्याला पटवून देईन,” रैनाने न्यूज 24 ला सांगितले. “पुढील हंगामात दोन नवीन संघ येणार आहेत पण मला सीएसकेकडून खेळत रहायचे आहे. मला आशा आहे की या स्पर्धेत आम्ही चांगली कामगिरी करू, मग गोष्टी कशा चालतात हे आपण पाहू.” धोनी आणि रैनामध्ये मैदानात आणि मैदानाबाहेरही मजबूत संबंध आहे. 2015 मध्ये धोनीची पत्नी साक्षीने ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान माहीकडे फोन नसल्यामुळे झिवाच्या जन्माविषयी माजी भारतीय कर्णधाराला माहिती देण्यासाठी रैनाशी संपर्क साधला होता. रैना आणि धोनी दोघे 2008 मध्ये परत सीएसके मध्ये दाखल झाले होते. धोनी पूर्णवेळ कर्णधार असून रैना सीएसकेचा माजी उपकर्णधार आहे. धोनीच्या अनुपस्थितीत त्याने संघाचे नेतृत्व केले आहे.

आयपीएल 2011, 2014 आणि 2018 मेगा-लिलावापूर्वी सीएसकेने दोन्ही खेळाडूंना रिटेन केले होते. गेल्या वर्षी रैनाने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल 2020 मधून माघार घेतली होती. त्याला आयपीएल 2021 मध्ये कायम ठेवण्यात आले आणि यंदाचा हंगाम स्थगित होण्यापूर्वी त्याने सीएसकेसाठी पुनरागमन केले. दरम्यान, आयपीएल 2021 च्या दुसर्‍या टप्प्यासाठी रैना युएईला रवाना होणार आहे.